नाशिक : रमजान पर्व या पवित्र महिन्यात सधन मुस्लीमांवर धर्माने जकात व दानधर्म करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार शहरातील मुस्लीमांकडून दानधर्माचे कृतीशिल नियोजनास प्रारंभ करण्यात आला आहे. धान्यदानासाठी धान्य खरेदीकरण्याकडे कल वाढला आहे. शहरातील धान्य दुकानांवर मुस्लीमांची गर्दी दिसू लागली आहे.समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, रमजान पर्व, ईदचा महान सण सर्व घटकांना आनंदाने साजरा करता यावा, कोणीही या काळात गरीबीमुळे नैराश्यामध्ये जाऊ नये, या उद्देशाने सधन मुस्लीमांना समाजातील गोरगरीब, गरजु, विधवा, अनाथ अशा घटकांच्या मदतीला धावून जाण्याचे आदेश ‘शरियत’मध्ये दिले आहे. धर्माने सधन मुस्लीमांची साधी-सोपी व्याख्या केली आहे. ज्या व्यक्तीकडे साडे सात तोळे सोने किंवा साडे बावन्न तोळे चांदी असेल ती व्यक्ती सधन मानली गेली आहे. त्याने त्या वर्षी आपल्या एकूण संपत्तीचा अडीच टक्के भाग गोरगरीबांसाठी ‘जकात’ म्हणून काढणे गरजेचे आहे. तसेच धान्यदान (फित्रा) आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार करणे बंधनकारक आहे. दरम्यान, यामागे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उद्देश आहे.गहू, तांदूळ खरेदीची नियोजन सधन मुस्लीम कुटुंबांकडून सुरू झाले आहे. धान्य खरेदीकडून फित्रा वाटपाचे नियोजन केले जात आहे. एकूण संपत्तीच्या अडीच टक्क्यानुसार हिशोब जुळवून येणारी रक्कम ‘जकात’ म्हणून दान करण्याचे आवाहन धर्मगुरूंनी पहिल्याच शुक्रवारी मशिदींमधून प्रवचनाद्वारे केले आहे.‘जकात-फित्रा’ कोणाला द्यावा?रमजान काळात दानधर्म करताना सर्वप्रथम ‘जकात-फित्रा’ आपल्या रक्ताच्या नात्यांमधील गोरगरीबांचा शोध घ्यावा त्यानंतर आपल्या संपुर्ण खानदानमध्ये गरीब नातवाईकांचा शोध घ्यावा, त्यानंतर ज्या ठिकाणी राहतो त्या भागात गरजूंचा शोध घ्यावा, तेथेही न आढळल्यास गाव, शहरामध्ये शोध घेऊन त्याच्यापर्यंत ‘जकात-फित्रा’ पोहचवावा, असे धर्माने म्हटले आहे. एकूणच चौकस व प्रामाणिकपणे हे कर्तव्य पार पाडावे, यासाठी रमजानच्या पुवार्धच निवडावा असे धर्मगुरू सांगतात.
रमजान पर्व : सधन मुस्लीमांकडून दानधर्माचे कृतिशिल नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 5:53 PM
समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, रमजान पर्व, ईदचा महान सण सर्व घटकांना आनंदाने साजरा करता यावा, कोणीही या काळात गरीबीमुळे नैराश्यामध्ये जाऊ नये, या उद्देशाने सधन मुस्लीमांना समाजातील गोरगरीब, गरजु, विधवा, अनाथ अशा घटकांच्या मदतीला धावून जाण्याचे आदेश ‘शरियत’मध्ये दिले आहे
ठळक मुद्देधान्यदानासाठी धान्य खरेदीकरण्याकडे कल वाढला संपत्तीचा अडीच टक्के भाग गोरगरीबांसाठी ‘जकात’ म्हणून काढणे गरजेचे गहू, तांदूळ खरेदी नियोजन सधन मुस्लीम कुटुंबांकडून सुरू