नाशिक : यंदाचे रमजान पर्व चालू महिन्याच्या पंधरवड्यात आल्याने उन्हाची तीव्रता जरी असली तरी समाजबांधवांमध्ये रमजानचा उत्साह अधिक जाणवत आहे. सोशल मीडियावरून फिरणाऱ्या ‘रमजान मुबारक’च्या संदेशांद्वारे रमजानची चाहूल लागली आहे. इस्लामी कालगणनेतील ‘रमजानुल मुबारक’ हा एक महिना असून, हा संपूर्ण महिना निर्जळी उपवासांचा (रोजा) महिना म्हणून ओळखला जातो. रमजानमध्ये धार्मिक कार्यावर अधिकाधिक भर समाजबांधवांकडून दिला जातो. रमजान पर्वाच्या दृष्टीने मुस्लीम बांधवांकडून तयारी केली जात आहे. उपवासांचे नियोजन असलेल्या वेळापत्रकांचे वाटप विविध मशिदींमधून गेल्या शुक्रवारी करण्यात आले. यावर्षी रमजान पर्वाला मेच्या पंधरवड्यातच सुरुवात होत असल्याने निम्मे पर्व उन्हाळ्यात संपणार आहे. धार्मिकदृष्ट्या रमजान पर्वाला विशेष महत्त्व असून, या महिन्यात समाजबांधवांकडून धार्मिक कार्यावर मोठा भर दिला जातो. यामुळे पहाटेपासून तर रात्रीपर्यंत मशिदींमध्ये वर्दळ पाहावयास मिळते. त्यामुळे मशिदींमधील व्यवस्था व सोयीसुविधा अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे. बैठकव्यवस्थेपासून ध्वनी, वीज, पाणी व्यवस्था वाढविण्याचा प्रयत्न विश्वस्त मंडळांकडून होत आहे.स्वतंत्र धर्मगुरूंची नियुक्तीरमजान पर्वामध्ये दररोज रात्री ‘तरावीह’च्या विशेष नमाजचे पठण करण्याची प्रथा आहे. या नमाजपठणादरम्यान संपूर्ण कुराण मुखोद्गतरीत्या पठण केला जातो. महिनाभरात कुराणपठण यादरम्यान पूर्ण केले जाते. यासाठी ज्या धर्मगुरूंचे कुराण मुखोद्गत आहे, अशा धर्मगुरूंची (हाफिज)अतिरिक्त धर्मगुरू म्हणून मशिदींमध्ये स्वतंत्ररीत्या नियुक्ती केली जात आहे.
पंधरा तासांचा असणार रमजानचा ‘रोजा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:37 AM