नाशिक : अनंतकोटी ब्रह्मांड नायक । महाराजाधिराज योगीराज । परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतीपालक । शेगाव निवासी समर्थ सद्गुरू । श्री संत गजानन महाराज की जय ।।, ‘जय गजानन माउली’, ‘गण गण गणात बोते’ या आणि अशा जयघोषात शनिवारी (दि. १८) गजानन महाराज प्रगटदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील गजानन महाराजांच्या विविध मंदिरांत प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी पहाटेपासूनच अभिषेक, काकडा भजन, आरती, गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण, भागवत कथा, पाद्यपूजा, रुद्राभिषेक यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही मंदिरांमध्ये दुपारी तर काही मंदिरांमध्ये संध्याकाळी भव्य पालखी सोहळ्यानंतर गजानन महाराजांचा प्रगटदिन सोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विदर्भ कॉलनी येथेही गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मंदिरात सकाळी रुद्राभिषेक, रामदास शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन तर दुपारी महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विदर्भ कॉलनीतील मंदिरात संध्याकाळी साडेपाच वाजता पालखी मिरवणूक, तर दुपारी १२ वाजता गजानन महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पंचवटी, उपेंद्रनगर, इंदिरानगर, वनवैभव, प्रशांतनगर पाथर्डी फाटा, पाटीलनगर त्रिमूर्ती चौक, वृंदावननगर म्हसरूळ, नाशिकरोड आदि गजानन महाराजांच्या मंदिरांमध्ये प्रगट दिन सोहळा पारंपरिक पद्धतीने तसेच भक्तिमय वातावरणात पार पडला. संध्याकाळी सात वाजता आरती आणि रात्री ८ वाजता भजन सेवेने प्रगटदिन सोहळ्याची सांगता झाली.
शेगावीचा राणा गजानन
By admin | Published: February 19, 2017 12:10 AM