नाशिक - राज्य शासनाच्या वनविभागामार्फत यंदा राज्यात सुमारे १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत नाशिक महापालिकेला १२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून या व्यतिरिक्त महापालिकेमार्फत ‘रानमळा’ पॅटर्ननुसार सुमारे १५ हजार वृक्षांची लागवड लोकसहभागातून केली जाणार आहे. दरम्यान, मागील वर्षी महापालिकेने शासनाच्या योजनेत सहभागी होत केलेल्या वृक्षलागवडीत ८७ टक्के झाडे जगल्याचा दावा केला आहे.राज्य शासनाने नाशिक महापालिकेला यंदा १२ हजार ४३२ वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी महापालिकेने ५४ ठिकाणी १२ हजार खड्डे खोदून ठेवले आहेत. महापालिकेच्या खुल्या जागा, शाळा, रुग्णालये, रस्त्याच्या दुतर्फा तसेच गोदावरी नदी किनारी सदर वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती प्रभारी उद्यान अधिक्षक व उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली आहे. शासनाने दिलेल्या उद्दिष्टाव्यतिरिक्त महापालिकेमार्फत खेड तालुक्यातील ‘रानमळा’पॅटर्ननुसार लोकसहभागातून सुमारे १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वनविभागामार्फत महापालिकेला२०१६ मध्ये ३ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महापालिकेने ३०६८ वृक्षांची लागवड केली. त्यातील २२७० झाडे (७४ टक्के) झाडे जगली. सन २०१७ मध्ये ५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महापालिकेने ५१६६ झाडे लावली तर त्यातील ४४९० (८७ टक्के)झाडे जगली. याशिवाय, महापालिकेने अमृत अभियानांतर्गत पंचक येथे २०१५-१६ मध्ये ४५०० झाडे लावली तर मखमलाबाद येथील तवली फाटा येथे ११ हजार झाडे लावली. त्यात ३५२७ फळझाडांचा समावेश होता. महापालिकेने सन २०१६-१७ मध्ये न्यायालयाच्या निर्देशानंतर २१ हजार वृक्षांची लागवड केली होती. त्यात दहा फूट उंचीची कदंब, पिंपळ, वड, जंगली बदाम, कडूनिंब, पायर, करंज, कांचन या देशी वृक्षांचा समावेश होता. यामधील तब्बल ८६ टक्के झाडे जगल्याचा दावाही महापालिकेने केला आहे.
नाशकात महापालिका राबविणार ‘रानमळा’ पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 6:37 PM
पुढाकार : लोकसहभागातून करणार वृक्षलागवड
ठळक मुद्देनाशिक महापालिकेला १२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट मागील वर्षी महापालिकेने शासनाच्या योजनेत सहभागी होत केलेल्या वृक्षलागवडीत ८७ टक्के झाडे जगल्याचा दावा