शैलेश कर्पे सिन्नरमहाशिवरात्री व जागतिक महिला दिन या सलग दोन दिवशी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी जो काही आग्रह धरला त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासनासह सर्वांचीच चांगली दमछाक झाली. बघ्यांनी केलेली गर्दी आणि दूरचित्रवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी याला अतिशय गांभीर्याने घेतल्याने या घटनेला जास्त महत्त्व प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. त्र्यंबकेश्वर येथील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देवस्थान समितीला निवेदन दिले होते. त्यानंतर त्यांनी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक महिला व हिंदुत्ववादी संघटनांनी यास तीव्र विरोध दर्शविला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे गृहीत धरून नाशिक ग्रामीण पोलिसांनी भूमाता ब्रिगेडला जिल्ह्याच्या सरहद्दीवरच अडविण्याची व्यूहरचना केली होती.महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी देसाई यांच्यासह कार्यकर्त्या पुण्याहून निघाल्याचे दूरचित्रवाहिन्यांवर वारंवार दाखविले जात होते. पोलिसांनी त्यांना अडविण्यासाठी सकाळपासूनच नांदूरशिंगोटे गावाजवळ तळ ठोकला होता. अनेक अफवांचे पेव फुटत होते. ताफ्यातून काही वाहने गायब झाल्याचेही सांगितले जात होते. प्रत्यक्षात देसाई यांच्यासह सुमारे ५० महिला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास नांदूरशिंगोटेजवळ आल्या. पुण्याहून नांदूरपर्यंत येण्यासाठी त्यांना अनेक तास लागले. यामुळे ३०० पोलिसांचा ताफा दिवसभर उन्हातान्हात ताटकळला होता. प्रसारमाध्यमांच्या अनेक ओबी व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे बघ्यांची बरीच गर्दी झाली होती. नाशिक-पुणे महामार्गाने वाहनातून जाणारे प्रवासीही काहीतरी विपरीत घडल्याच्या आविर्भावाने पोलीस व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे पाहत होते. त्यामुळे भूमाता ब्रिगेडपेक्षा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व बघ्यांना आवरण्याची वेळ पोलिसांवर आल्याचे दिसून आले.सुमारे दीड तास महामार्गावर चर्चा चालल्यानंतर भूमाताच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिस वाहनातून एका मंगल कार्यालयात नेण्यात आले. थेट प्रक्षेपण दाखविणारे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने पोलिसांनाही अनेक बंधने आल्याचे जाणवले. शनिशिंगणापूरला जाण्यासाठी निघालेल्या भूमाता ब्रिगेडचा ताफा अशाच पद्धतीने अहमदनगरच्या सरहद्दीवर अडविण्यात आल्याचा अनुभव तृप्ती देसाई यांना असल्याने त्यांनी माघारी परतल्यानंतर पुन्हा ‘यू टर्न’ घेऊन पोलिसांनी चांगलीच दमछाक केल्याचेही दिसून आले. प्रसारमाध्यमांनी या घटनेला अति महत्त्व दिल्यानेच दोन दिवस प्रशासनाची दमछाक झाल्याची चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)
रणरागिणींनी केली दमछाक
By admin | Published: March 10, 2016 11:11 PM