नाशिक : मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात मराठा समाजाची भूमिका मांडताना सरकारने कोपर्डीतील निर्भयाला न्याय देऊन या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या नऊ रणरागिणी कडाडल्या.नाशिकमधून मोर्चात सहभागी झालेल्या दिव्या साळुंखे, रसिका शिंदे, ऋतुजा दिघे, गायत्री मगर, आकांक्षा पवार, रुचा पाटील, मयूरी पिंगळे, दिव्या महाले आणि काजल गुंजाळ यांनी मोर्चात सहभागी होऊन आझाद मैदानातील मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावरून कोपर्डी अत्याचार व हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य दुरुस्ती करावी, प्रकल्पांसाठी शेतजमीन संपादन करताना शेतकºयांना देशोधडीला लावणे बंद करावे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत देणे, कुणबी, मराठा-कुणबी यांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्या आदी मागण्या सरकारसमोर मांडल्या. या मुलींनी नाशिकमध्ये निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातूनही मराठा समाजाची भूमिका परखडपणे मांडली होती.तसेच नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन व व्यवस्थापन या सर्व गोष्टींमुळेच नाशिकच्या सर्वच रणरागिणींना मुंबईतील आझाद मैदानावरील व्यासपीठावरून संवाद साधण्याची संधी मिळाल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या तज्ज्ञ समितीचे करण गायकर यांनी सांगितले.