वडाळागाव / इंदिरानगर : रहिवासी परिसरात सर्रासपणे मद्यविक्री, बियर बार चालविणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध कठोर कारवाई करत व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी सावतामाळी कॅनॉल रस्त्यावरील खोडेनगरमधील महिलांनी आक्रमक होत जोरदार आंदोलन केले.वडाळा-डीजीपीनगर क्रमांक एक या रस्त्यावर खोडेनगरच्या परिसरात असलेल्या ‘रुंग्टा कॅसल’ सोसायटीच्या महिला सोमवारी (दि.१०) रस्त्यावर उतरल्या. शेकडोच्या संख्येने महिलांनी दारू दुकानापुढे एकत्र येत ‘दारू दुकान बंद करा, बंद करा’, ‘नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी’ अशा घोषणा देत ठिय्या आंदोलन केले.या सोसायटीमध्येच रस्त्याच्या दिशेने ‘कर्मा रेस्टॉरंट अॅण्ड बार’ तसेच ‘के-९ बियर अॅण्ड वाइन शॉपी’ ही मद्यविक्रीची दुकाने आहेत ‘बार हटवा, परिसर वाचवा’, ‘दारू दुकानदाराचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘दारू दुकान बंद करा, मुलांचे भविष्य वाचवा’ अशा घोषवाक्यांचे फलक झळकवत या सोसायटीसह परिसरातील रहिवाशांनी एकत्र येत ठिय्या दिला.दरम्यान, बार या आंदोलनाच्या भीतीमुळे बंद जरी असले तरी शेजारी बियर-वाइन विक्रीच्या दुकानामधून आंदोलना दरम्यान मद्यविक्री केली जात असल्याने महिला अधिक आक्रमक झाल्या. दरम्यान, महिलांनी राज्य उत्पादन शुल्क, पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.मध्यरात्रीपर्यंत येथील दुकानांमधून सर्रासपणे मद्यविक्री केली जाते तसेच मद्यपींकडून रात्री धिंगाणा घालत शिवीगाळ करतात. त्यामुळे घरांमधील लहान मुलांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होतो. तसेच घरात राहणेदेखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे रहिवाशांनी आंदोलनाची भूमिका घेतली. यावर प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे. या आंदोलनात सोसायटीमधील शाळकरी मुलेदेखील सहभागी झाली होती.‘दारूबंदी’च्या घोषणाअन् मद्यविक्री सुरूच दारु दुकान बंद करण्याच्या घोषणा आंदोलकांकडून दिल्या जात असतानाच दुसरीकडे वाइन शॉपीमधून सर्रासपणे मद्यविक्री सुरू होती. यावेळी कुठल्याहीप्रकारे रहिवाशांच्या आंदोलनाची दखल संबंधित विक्रेत्याने घेतली नसल्याचे दिसून आले. दारू विक्रीचा जरी परवाना असला तरी सर्वनियमांची पायमल्ली करण्याचा परवाना विक्रेत्यांना दिला कोणी? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. रहिवासी भागातील दारूविक्री थांबवावी, या मागणीसाठी नगरसेवकांपासून तर थेट आमदारांपर्यंत आणि पोलीस ठाण्यापासून आयुक्त कार्यालयापर्यंत निवेदनांचा पाऊस पाडला; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे महिलांनी सांगितले.
दारू दुकानाविरोधात रणरागिणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:42 AM