पंचवटी : वेळ मध्यरात्री दोन वाजेची... ठिकाण औरंगाबाद रोडवरील रामांजनेय मंदिराजवळील नागरी वसाहत. दोन ते तीन चोरटे एका बंगल्याच्या जवळ चोरीच्या इराद्याने फिरत असल्याची चाहूल लागताच काही सुज्ञ नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला. आडगाव पोलिसांचे गस्ती पथकही या सुमारास याच परिसरात गस्त घालत असल्याने पथकातील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, परिसरातील पथदीप बंद असल्याने चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. तब्बल अर्धा तास परिसरात चोर-पोलीस पाठशिवणीचा खेळ रंगला होता. दरम्यान, या प्रकारानंतर काहीसे भीतीचे वातावरण पसरले असून, नागरी वसाहतीतील पथदीपदेखील बंद असल्याने ते त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रामांजनेय मंदिराजवळ असलेल्या नागरी वसाहतीत गुरुवारी (दि. २१) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दोन ते तीन चोरटे परिसरात चोरी करण्याच्या इराद्याने फिरत असल्याचे एका इसमाच्या निदर्शनास आले, त्याने तत्काळ सदर माहिती पोलिसांना कळविली. आडगाव पोलिसांचे पथक त्याच परिसरात गस्त घालत होते. घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.
रंगला ‘चोर-पोलिसांचा खेळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:42 AM