नाशिक : पुणे येथील प्रसिद्ध सतारवादक अनिरुद्ध जोशी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत केलेल्या सतारवादनाने माघी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफले. रसिक श्रोत्यांनी या मैफलीला मनमुराद दाद दिली.१२८व्या माघी उत्सवाच्या दुसºया दिवशी सतारवादक अनिरुद्ध जोशी यांच्या सतारवादनाचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ सतारवादक डॉ. उद्धव आष्टुरकर यांचीदेखील यावेळी उपस्थिती होती. जोशी यांनी मैफलीचा प्रारंभ राग शामकल्याणमध्ये आलाप व जोडने केला. प्रारंभापासूनच त्यांनी रसिकांची दाद मिळवली. त्याच रागात विलंबित तीनतालात मसीतखानी गत आणि नंतर द्रुत रजाखानी गत व झाला सादर केला. त्यानंतर राग मिश्र खमाजमध्ये एक बंदीश सादर केली. तर मैफलीची सांगता काटा रु ते कुणाला या प्रसिद्ध नाट्यगीताने करीत ही मैफल यादगार केली. गौरव तांबे यांनी अतिशय समर्पक तबलासंगत केली. कलाकारांचा परिचय सुजित काळे यांनी करून दिला, तर ज्येष्ठ सतारवादक डॉ. आष्टुरकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास डॉ. अविराज तायडे, प्रा. नितीन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
माघी उत्सवानिमित्त रंगले सतारवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 1:45 AM