पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीवरून तालुक्यात आजी - माजी आमदारांच्या समर्थांकडून सोशल वार रंगले आहे.निफाड तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, या रुग्णांवर लासलगाव व पिंपळगाव कोविड केंद्रात उपचार होत आहे. मात्र कोविड रुग्णांना आॅक्सिजन सेवा मिळावी यासाठी पिंपळगाव येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे बुधवारी (दि. २)आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. हे रुग्णालय माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांच्याकडे पाठपुरावा करून २००८मध्ये ग्रामपंचायतकडून जागा वर्ग करून मंजूर केल्याचे बनकर यांनी सांगितले. त्यानंतर काही तासांमध्येच माजी आमदार अनिल कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर कामाच्या पाठपुराव्याची पोस्ट व या कामासंबंधीचे कागदपत्रे दाखवित ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’, श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा शिवसेना स्टाइलने धडा शिकवला जाईल अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आली.दुसरीकडे याच पोस्टच्या काही तासांनंतर बनकर यांच्या कार्यकर्त्यांनी या पोस्टला प्रतिउत्तर देत या रुग्णालयाचा पाठपुरावा करून बनकर यांनी आॅक्टोबर २००८ मध्येच प्रशासकीय मान्यता करता पाठवले होते तसेच सदर रुग्णालयाची जागा ही पिंपळगाव ग्रामपलिकेकडून वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सोशल मीडियावर पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेयवादावरून निफाड तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांच्याकडे २००८ मध्ये मागणी करून पिंपळगाव रुग्णालयांची मजुरी घेण्यात आली होती. त्यामुळे या रुग्णालयाबाबतीत कोणत्याही प्रकारचे श्रेय घेण्याचा प्रश्न नाही. राजकारण करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर दिले जाईल.- दिलीप बनकर, आमदार, निफाड
पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाचे काम अद्यापही पूर्णत्वास नसून श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याने अशा लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण वर्गाची गरज भासत आहे. १ वर्षामध्ये स्वत: च्या गावात किती विकासकामे केली आहे ते त्यांनी दाखवून द्यावे.-अनिल कदम, माजी आमदार, निफाड