पंचवटी : येथील श्री कपालेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी (दि.१२) त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पौर्णिमेनिमित्त श्री कपालेश्वर मंदिराच्या बाहेर सकाळी महिलांनी कापूर वाती पेटवून दीप प्रज्वलन करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने गर्दी केली होती.पूर्वीच्या काळी पृथ्वीतलावर त्रिपुरा नावाच्या राक्षसाने खूप अहंकार माजविलेला होता त्यावेळी या अहंकार माजविणाऱ्या त्रिपुरा राक्षसापासून रक्षण करण्यासाठी प्रजेने भगवान (शंकर) महादेवाला साकडे घातले होते. त्यानंतर भगवान महादेवाने त्रिपुरा नावाच्या राक्षसाचा वध करून प्रजेचे रक्षण केले होते. तेव्हापासूनच महिला भगिनी आपले सौभाग्य टिकून राहावे तसेच पतीला आणि मुलांना उत्तम चांगले आरोग्य लाभावे यासाठी महादेवाच्या मंदिराबाहेर कापूर वात जाळून देवाचे मनोभावे पूजन करतात.मंगळवारी सकाळी कपालेश्वर मंदिरासह परिसरातील अन्य ठिकाणच्या शिवमंदिराबाहेर वाती जाळण्यासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, मंगळवारी त्रिपुरा पौर्णिमानिमित्ताने सायंकाळी राममंदिर व अन्य ठिकाणच्या मंदिरात पेटते दीप प्रज्वलित करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर लख्ख दिव्यांनी उजळून निघाला होता.भाविक नतमस्तकत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने गोदाकाठावरील मंदिरांमध्ये दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रिघ सुरू होती. सायंकाळी अनेक मंदिरांबाहेर भाविकांनी दिवे प्रज्वलीत केल्याचे दिसून आले.
त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त रंगला दीपोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:42 AM