नाशिक : गणपती अथर्वशीर्ष पठणाचा गुंजणारा स्वर, आकर्षक रांगोळ्या आणि गणेश आरतीच्या मंगल सुरावटींनी भक्तिमय झालेल्या वातावरणात शहरातील गणेश मंदिरांमध्ये माघी गणेश जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म असल्याने सोमवारी सर्व गणेश मंदिरे तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणरायांवर संकटनाशनं गणेशस्तोत्राचाही अभिषेक करण्यात आला.
गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. बहुतांश मंदिरांमध्ये पहाटेपासून मंत्रोच्चार आणि सनई वादनाने महाभिषेकाला झालेली सुरुवात तसेच मंत्रजागर आणि पालखी मिरवणुकांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. शहरातील गणेश मंदिरांमध्ये सोमवारी (दि. १५) माघी गणेश जयंती सोहळा धार्मिक वातावरणात आणि मंगलमय विधींनी साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच पूजाविधीला प्रारंभ झाल्याने सकाळपासूनच गणेश दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. शहरातील चांदीचा सिद्धिविनायक गणपती, नवश्या गणपती, साक्षी गणेश, पगडी गणेश, ढोल्या गणपती, तिळा गणपती, इच्छामणी गणेश, मेनरोडचा गणपती यासह सर्व गणेश मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. जास्वंदीची फुले, दुर्वांचे हार अर्पण करून गणेशमूर्तींची आकर्षक पूजा हे गणेश जयंतीचे वैशिष्ट्य असते. सर्व मंदिरात दुपारी गणेश जन्मकाळ सोहळ्यावेळी गणेश पाळणागीते म्हणण्यात आली. शहरातील विविध सार्वजनिक मंडळांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भव्य रांगोळ्यांनी मंदिराची शोभा आणखी वाढविली. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या गर्दीने गणेश मंदिर परिसर फुलून गेला.
इन्फो
मंदिरांमध्ये दर्शनासाठी रीघ
गंगापूर रोडवरील नवश्या गणपती मंदिरात गणेशमूर्तीवर महाभिषेक तसेच महाआरती करण्यात आली. सकाळी परंपरेनुसार आनंदवल्ली, सोमेश्वर मंदिर या भागात पालखी काढण्यात आली. दुपारी गणेश जन्म झाल्यानंतर गणेशयागाला प्रारंभ झाला. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली होती. रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित माघी गणेश जयंती सोहळ्यात गणेशमूर्तीचे अभ्यंगस्नान, महादुग्धाभिषेक, सहस्रधाराभिषेक आणि महाआरती करण्यात आली. दुपारी गणेश जन्म व पाळणा आरती करण्यात आली. तसेच भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. साक्षी गणेशलादेखील साग्रसंगीत पूजन, महाभिषेक करण्यात आला. काही पथकांनी ढोलवंदना केली. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली होती.