चांदवड : रंगमहाल चांदवडच्या इतिहासाचा साक्षीदार मानला जातो. पावणेतीनशे वर्षांपूर्वी अनेक उलथापालथी व घडामोडी रंगमहालाच्या परिसरात घडल्या. अनेक वर्षे ऊन,पावसाळे पाहिलेल्या या महालाचे बुरुज आणि भिंती आता जीर्ण होऊन डागडुजीला आल्या, महालातील ऐतिहासिक वस्तूंचे जतन करून रंगमहालाला ऊर्जितावस्था प्राप्त करून न दिल्यास हा ऐतिहासिक ठेवा जतन होण्याऐवजी भग्नावस्थेकडे वाटचाल करेल अशी भीती इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे.
अनेक वर्षांपासून येथील विविध प्रकारच्या कार्यालयामुळे याची देखभाल होत होती; मात्र ही कार्यालये येथून काढून दिल्याने हा देखणा वाडा काळाच्या पडद्याआड जाईल की काय अशी अवस्था आहे.
दरम्यान, रंगमहाल या वास्तूची दुरुस्ती आणि मूळ ढाचा कायम ठेवून नूतनीकरणासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी सन २०१५ साली आला असून याचे काम सहा वर्षांपासून सुरू होते. त्यानंतरही अजून सात ते साडेसात कोटी रुपयांचा निधी आला तरी हे काम संथगतीने सुरू आहे. सध्या काम बंद अवस्थेत आहे. दुरुस्तीच्या नावावर काम सुरू असले तरी वर्षानुवर्ष या रंगमहालाची छप्परे काढून घेतल्याने पावसाळ्यात जुनी कोरीव लाकडे व ऐतिहासिक ठेवा सडण्याच्या मार्गावर आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा राजवाडा असणारा रंगमहाल व होळकर वाडा हा इंदोर ट्रस्ट, खासगी देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटी ट्रस्ट (मध्यप्रदेश सरकार) या शासकीय प्रतिनिधीच्या अधिपत्याखाली आहे. त्याचे व्यवस्थापन चांदवड येथे असून व्यवस्थापक एम.के.पवार, सहा. व्यवस्थापक सुभाष पवार हे काम बघत आहेत. वर्षानुवर्ष या रंगमहालात वेगवेगळ्या प्रकारची २१ शासकीय कार्यालये सन १९९० पर्यंत कार्यरत होती, त्यावेळी रंगमहालाचा रुबाब व दबदबा वेगळा होता. येथे नित्यनियमित कार्यालय असल्याने साफसफाई होत असे, पूर्वीच्या काळी अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्या रंगमहालात न्यायदानाचे काम केले त्याच जागेवर न्यायालय होते. पुढे न्यायालयाला स्वतंत्र इमारत मिळाल्याने हे कार्यालय येथून बसस्थानकाकडे नेण्यात आले त्यानंतर रंगमहालमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, कृषी विभाग, आयटीआय, भूविकास बँक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अशा प्रकारची सुमारे २१ कार्यालये १९६१ पासून एका छताखाली होती. रंगमहाल ट्रस्टला सुमारे २० ते २५ हजार रुपयांचे दरमहा उत्पन्न मिळत असताना पुरातत्त्व विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली सदरची सर्व कार्यालये रिकामी करून घेतली व नियमानुसार येथे दुरुस्ती करावयाची आहे असे सांगितल्याने कार्यालयातील दररोज सकाळपासून येणारा राबता गेल्या दोन वर्षांपासून पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे रंगमहाल परिसराला सद्यस्थितीत स्मशानवैराग्य प्राप्त झाले आहे. तसेच परिसरातील व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पुरातत्त्व विभागाने व शासनाने रंगमहालची दुरूस्ती करण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगण्यात येत असून या रंगमहालाचे दुरुस्तीचे काम दीड वर्षापासून कासवगतीने सुरू होते. सध्या येथे गवताचे साम्राज्य व प्राणी राहत आोत; मात्र हे काम करीत असताना पुरातत्त्व विभागाच्या ठेकेदारांनी निकृष्ट प्रकारचे काम करून रंगमहालावरील कौले काढून घेतल्याने उघड्याबोडक्या अवस्थेत असलेल्या रंगमहालाच्या इमारतीमध्ये पाणी घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. योगायोगाने प्रारंभीच्या काळात पाऊस न झाल्याने रंगमहालावर पडझडीची वेळ आली नाही; मात्र ऊन, वारा,पाऊस यामुळे या उघड्या साठ्यातून पाणी मुरून रंगमहाल जीर्ण अवस्थेत झाला आहे.
सन १९९५ मध्ये ऐतिहासिक रंगमहालाची अहिल्यादेवी ट्रस्टच्या वतीने डागडुजी करण्यात आली. त्यावेळी रंगमहालमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ट्रस्टने अनेक प्रकारे लक्ष दिले असताना आज या पुरातन स्मारकाची वास्तू जतन करण्याऐवजी शासनच उपेक्षा करीत आहे. पूर्वीच्या काळातील रंगमहालाचे वैभव व आजचे वैभव यात मोठा बदल होत आहे. तर रंगमहालामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, अण्णा डांगे, नारायण राणे अशा अनेक मंत्र्यांनी भेटी दिल्या व होळकर वाड्याच्या आठवणी ताज्या ठेवल्या होत्या. सद्यस्थितीत सुरू असलेले संथगतीतील काम अनेक ठिकाणी प्लेवर ब्लॉक बसविले. त्यावरही मोठ्या प्रमाणात गवताने वेढा घातला आहे. तर चांगल्या नक्षीकामाचा ठेवा हळूहळू लोप पावत आहे. शासनाने लक्ष देऊन हा वाडा पर्यटकांसाठी खुला करावा अशी अपेक्षा जनतेची आहे.
फोटो - ३० चांदवड १
पुरातन होळकर कालीन अहिल्यादेवी यांचा अर्धाकृती पुतळा व राजगादीचे स्थान (छाया : रामोजी फोटो,चांदवड)
===Photopath===
300521\30nsk_29_30052021_13.jpg
===Caption===
पुरातन होळकर कालीन अहिल्यादेवी यांचा अर्धाकृती पुतळा व राजगादीचे स्थान (छाया : रामोजी फोटो,चांदवड)