जळगाव निंबायती (अमोल अहिरे) : होळी आणि धुलिवंदनानंतर येणाऱ्या रंगपंचमीचे लहानग्यांपासून सर्वांनाच मोठे आकर्षण असते. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने सर्वच सण उत्सवांवर पाणी फिरले आहे. मात्र, बाजारपेठेत आकर्षक विविध आकाराच्या रंगीबेरंगी पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात धुलिवंदनापेक्षा रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यंदाच्या रंगपंचमीवर कोरोनाचे सावट दिसून येत असले तरी, बाजारात दाखल झालेल्या विविध कार्टून्सच्या पिचकार्या लक्ष वेधून घेत आहेत.
चौकट: स्पायडर मॅन, डोरेमाॅन, मोटू-पतलू, छोटा भीम आदी कार्टून्सच्या पिचकार्या तसेच बंदुकीच्या आकाराच्या, लाईटच्या, फुग्यांच्या विविध नाविन्यपूर्ण पिचकार्या लहानग्यांना भूरळ पाडत आहेत. विविध नैसर्गिक रंगांनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, कोरोनाचा रंगालाही फटका बसला असून, यंदाच्या वर्षी विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिचकाऱ्यांच्या किमतीत दहा ते वीस टक्के वाढ झाली आहे. टाळेबंदीनंतर व्यवसाय पूर्वपदावर येत असतांनाच, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रशासनाकडून कडक निर्बंध लावले जात आहेत. त्यामुळे दुकानात विक्रीसाठी आणलेला माल पडून राहतो की काय, अशी चिंता विक्रेत्यांना सतावत आहे.
------------------------
नियमांचीच चौकट
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि नियमांचे उल्लंघन होऊ शकते, ही बाब विचारात घेता, प्रशासनाने सार्वजनिक रंगपंचमी साजरी करण्यावर बंधने घातली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी घरगुती स्वरुपात नियमांच्या चौकटीत राहून रंगपंचमी साजरी करावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनसोक्तपणे रंगात न्हाऊन निघण्याच्या आनंदाला यंदा मुकावे लागणार आहे. यंदा कोरोनामुळे रंगाचा बेरंग झाला असल्याने तरुणाईचा हिरमोड झाला आहे.
----------------
दरवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनामुळे मागणीत मोठी घट झाली आहे. लहान मुलांसाठीच्या कार्टून्सच्या पिचकाऱ्यांना काहीशी मागणी आहे. या पिचकार्या वीस रुपये ते चारशे रुपयांपर्यंत आहेत. मात्र, विविध प्रकारच्या रंगांना व एकमेकांच्या अंगावर टाकल्या जाणाऱ्या रंगाच्या फुग्यांना फारशी मागणी नाही. त्यामुळे रंगपंचमीचे साहित्य व इतर माल जास्त भरला नाही. मात्र, दुकानातील माल पूर्णपणे विकला जातो की नाही ही शंका आहे.
- महेश नान्नोर, रंग व पिचकारी विक्रेता, जळगाव निंबायती
----------------
होळी व रंगपंचमीची दरवर्षी मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतो. आम्ही सारे मित्र एकत्र येऊन मोठी धम्माल करतो. यंदा कोरोनामुळे मात्र घरातल्या घरातच भावासोबत रंगपंचमी साजरी करावी लागणार आहे. गेल्या वर्षी बंदुकीची पिचकारी घेतली होती. यंदा मात्र साधीच पिचकारी व कोरडे रंग घेतले आहेत.
- राम अहिरे, जळगाव निंबायती