नाशिक : मागील दोन वर्षांतील कोरोनाच्या काळात बंद झालेल्या सर्व रेल्वेगाड्या सुरू करणार असून, राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणेच रेल्वे सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली. आपल्या खासगी कामानिमित्त काही वेळ नाशिक येथे थांबलेले रावसाहेब दानवे यांनी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. कोळशाबाबत राज्य वीज वितरण कंपनीने ज्यावेळी नियोजन करायला हवे होते त्यावेळी केले नाही. त्यामुळे राज्यात विजेचे संकट जाणवत आहे. केंद्र शासनाकडे यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त कोळसा आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. राज्यातील नागरिकांना वीज पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून, केंद्राची जबाबदारी फक्त कोळसा पुरविण्याची असल्याचे त्यांनी राज्यातील वीज संकटाविषयी बोलताना सांगितले. बॉम्बस्फोटाच्या काळात स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दाउदच्या विरोधात सर्वसामान्य जनतेची बाजू घेतली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाउदशी संबंध असणाऱ्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोपही त्यांनी नवाब मलिक प्रकरणावर बोलताना केला.
चौकट-
युक्रेनमधील भारतीयांची चिंता
युक्रेन अडकलेल्या भारतीयांची केंद्र शासनाला चिंता असून तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. केंद्रातील चार मंत्री युक्रेन आणि रशियाच्या आजुबाजूच्या देशांमध्ये जाऊन भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, केंद्र शासन त्यांना मायदेशी आणेल, असा विश्वासही दानवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.