नाशिक: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक (Nashik) शहरात आज सामूहिक राष्ट्रगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी हजेरी लावली होती. पण, कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. अचानक पाऊस सुरू झाला आणि विद्यार्थी पावसात भिजत राहिले, त्याचवेळी रावसाहेब दानवे मात्र छत्रीखाली उभे होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने नाशिक शहरात आज सामुहिक राष्ट्रगायनाचा कार्यक्रम होता. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, नाशिक महानगर पालिका आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने संयुक्तरित्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सामूहिक राष्ट्रगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यानचा रावसाहेब दानवेंचा एक फोटो सध्या चर्चेत आला आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर विद्यार्थी पावसात भिज होते, तर रावसाहेब दानवे स्टेजवर छत्रीमध्ये उभे होते.
विशेष म्हणजे, दानवेंसाठी एक व्यक्ती छत्री घेऊन उभा होता. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांना ट्रोलदेखील केले जात आहे. या फोटोमुळे मंत्रीसाहेब छत्रीत आणि विद्यार्थी भरपावसात, असे दृष्य पाहायला मिळाले. दरम्यान, भिजणाऱ्या विद्यार्थ्यासाठी तात्पुरते छप्पर उभारण्याची तसदी एकाही अधिकाऱ्याने घेतली नाही.