रामसर दर्जा मिळालेल्या नांदुरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात परदेशी पक्ष्यांचे आगमन होऊ लागल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पांढरा करकोचा, डोमिसाइल क्रेन, फ्लेमिंगो या पाहुण्यांच्या आगमनाची अद्याप पक्षीप्रेमींना प्रतीक्षा कायम आहे. बुधवारी (दि.३०) अभयारण्यातील चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, कोठुरे, कुरुडगाव, काथरगाव अशा ७ ठिकाणी नाशिक वन्यजीव विभागाच्या नांदुरमधमेश्वरचे सहायक वनसंरक्षक भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल काळे यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गाइड, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीच्या पक्षी निरीक्षकांनी पक्ष्यांची गणना केली. पक्षी निरीक्षण प्रगणनेत विविध पाणपक्षी व झाडांवरील पक्षी यांच्या नोंदी घेण्यात आल्या. एकूण ६६ प्रजातींचे २७ हजार ४४ पाणपक्षी, झाडांवरील ४ हजार ८५८ पक्षी व गवताळ भागातील काही पक्षी अशा एकूण ३१ हजार ९०२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. सकाळी सात ते साडेदहा आणि सायंकाळी तीन ते पाच या वेळेत गणना पूर्ण करण्यात आली.
---इन्फो--
वाढत्या थंडीसोबत चित्रबलाकची संख्या वाढली
डिसेंबर महिन्यात थंडीत झालेल्या वाढमुळे अभयारण्यात चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) व वारकरी पक्ष्याची संख्याही वाढली आहे. यासोबतच मार्श हॅरियर, ऑस्प्रेसारख्या शिकारी पक्ष्यांसह उघड्या चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, गढवाल, स्पुनबिल, कमळपक्षी, शेकाट्या, नदीसुरय यांसह आदी गवताळ भागात आढळणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाटदेखील आता वाढला आहे.
--
फोटो आर वर ३१नांदूर१/२/३ नावाने सेव्ह आहेत.