--------------------
दूध उत्पादकांना मास्कचे वाटप
सिन्नर : तालुक्यातील बारागावपिंप्री येथील १२५ दूध उत्पादक शेतकऱ्यांना हिंदुस्तान किड्स कंपनीच्या वतीने मास्क वितरित करण्यात आले. कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मास्क वापरणे गरजेचे असल्याने कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना मास्क देण्याबरोबरच त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. श्रीकृष्ण दूध संकलन केंद्रावर हा उपक्रम राबविण्यात आला. केंद्राचे संचालक दत्तात्रय गोसावी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
--------------------
लसीकरणाचे डोस वाढविण्याची मागणी
नांदूरशिंगोटे : लोकसंख्येच्या प्रमाणानुसार तालुक्याच्या ग्रामीण भागातील अतिशय कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे. ग्रामीण भागात लसीकरणाचे डोस वाढविण्यात यावे अशी मागणी होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यास जास्तीत जास्त नागरिक लस देणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मृत्यू संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
------------------
कांदा साठवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग
नांदूरशिंगोटे : यंदा कांद्याचे बियाणे अनेक भागात बोगस निघाल्याने उत्पन्नात घट झाली. कांदा लागवडीसाठी लागणारा खर्चदेखील मिळणाऱ्या भावातून निघत नसल्याने शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा भरण्याची लगबग सुरू केली आहे. बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना रक्कम मोजावी लागली होती. काही भागात कांद्याची प्रतवारी चांगली असल्याने कांदा साठवणुकीवर भर दिला जात आहे.
-----------------
शिवाजीनगरला नागरिकांचे लसीकरण
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (माळवाडी) येथे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी ११० नागरिकांना पहिला डोस देण्यात आला. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सरपंच जयश्री आव्हाड यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
--------------------
बाह्यवळण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
नांदूरशिंगोटे : गावाबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. नाशिक - पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर गावातील वाहतुकीसाठी रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रोड ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे.