सिन्नर : शहरातील भाजीबाजारातील गर्दीला अटकाव घालण्यासाठी तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महसूल, आरोग्य विभाग, नगरपालिका आणि पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहेत. शनिवारी (दि.१७) प्रशासनाने भाजीबाजारातच विक्रेत्यांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेऊन पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोघा विक्रेत्यांची रवानगी थेट इंडियाबुल्स येथील कोविड सेंटरला केली.
भाजीबाजारात विक्रेत्यांच्या १०० चाचण्या करण्यात आल्या. पैकी ९८ विक्रेत्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. निगेटिव्ह टेस्ट आलेल्या विक्रेत्यांना जागेवरच प्रमाणपत्र देऊन त्यांना बाजारात भाजीपाला विक्रीसाठी बसण्याची परवानगी देण्यात आली. प्रमाणपत्राची मुदत १५ दिवसांची असून, विक्रेत्यांनी ते जवळ बाळगणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र नसणाऱ्या विक्रेत्यांना भाजीबाजारात बसू दिले जाणार नसल्याच्या सूचना प्रशासनाने विक्रेत्यांना दिल्या. शहरवासीयांच्या हितासाठी भाजीविक्रेत्यांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली.
शहरातील मुख्य बाजारपेठ बंद असली तरी भाजीबाजारात मात्र गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. अनेक नागरिक कारण नसताना भाजीबाजारात फिरकत आहेत. भाजीविक्रेत्यांपासूनही कोरोनाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. विक्रेत्यांना कोरोनाची लागण झालेली असल्यास ही मंडळी सुपर स्प्रेडर ठरु शकता. ही शक्यता गृहित धरून आरोग्य विभागाने भाजी विक्रेत्यांची थेट बाजारात जाऊन रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. या चाचणीत ज्या विक्रेत्यांची चाचणी पॉझिटिव्ह येईल, त्यांना उपचारासाठी थेट मुसळगाव येथील इंडियाबुल्स कोविड सेंटरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला, तर निगेटिव्ह अहवाल येणाऱ्या भाजीविक्रेत्यांना आरोग्य विभागाकडून नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रशांत खैरनार यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोहन बच्छाव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार, शहर अभियान समन्वयक अनिल जाधव, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह महसूल, आरोग्य, नगरपालिका आणि पोलिस अशा चारही विभागांचे अधिकारी, कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
-----------------
निगेटिव्ह चाचणी आलेल्यांनाच विक्रीची परवानगी
निगेटिव्ह चाचणी आलेल्या विक्रेत्यांनाच बाजारात भाजीपाला विक्रीची परवानगी दिली जाणार असल्याची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आल्याने प्रारंभी चाचणीसाठी नाके मुरडणाऱ्या भाजीविक्रेत्यांनी स्वतःहून रॅपिड टेस्टसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे भाजीबाजारातील कोरोना संसर्गाला अटकाव बसण्यास मदत होणार आहे.
--------------------------
रुग्णवाहिका सज्ज
वंजारी समाज मैदानावर असलेल्या क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कार्यालयातील एका खोलीमध्ये आरोग्य विभागाच्या पथकाकडून रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. तर महसूल, पोलीस, नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी, अधिकारी भाजीबाजारात फिरून विक्रेत्यांना टेस्ट करण्याचे आवाहन करत होते. दुसरीकडे पॉझिटिव्ह अहवाल येणाऱ्यांची रवानगी इंडिया बुल्स कोविड सेंटरला करण्यासाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती.
-------------
सिन्नरच्या आडवा फाटा येथील वंजारी समाज मैदानावरील भाजीबाजारात विक्रेत्यांची कोरोना रॅपिड टेस्ट करताना आरोग्य विभाग आणि नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी. (१९ सिन्नर १)