निफाड : शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्याच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली असून, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या २५ नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली असून, या सर्वांच्या रॅपिड टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केलेला आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांनी घरीच बसावे, त्यांना नियमांचे महत्त्व कळावे, या उद्देशाने निफाड पोलीस ठाण्याच्या वतीने अशा नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
येथील शांतीनगर त्रिफुली येथे नाकाबंदीदरम्यान असे रस्त्यावर फिरणारे २५ नागरिक आढळले. या २५ नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. या सर्वांच्या रॅपिड टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मंडलिक यांनी या टेस्ट केल्या.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक रंगराव सानप, पोलीस हवालदार शिवाजी माळी, विलास बिडगर, ज्ञानेश्वर सानप, भारत पवार, मनोज आहेर आदी उपस्थित होते.