ममदापूर : लभान तांडा वस्ती येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ममदापूर ग्रामपंचायतीने मागील महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी करूनदेखील अद्यापपर्यंत टॅँकर सुरू न झाल्याने उसतोडी करून तांड्यावर परत आलेल्या ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, केव्हाही पिण्याच्या पाण्यासाठी उद्रेक होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी ममदापूर परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे गावातील कुठल्याही विहिरीत पाणी नाही. तसेच ग्रामपंचायत मालकीची विहीर कोरडी असल्याने जानेवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लभान ताडा वाडी-वस्तीकडे सगळ्या यंत्रणेचे लक्ष कमी असल्याने गावात पिण्याच्या पाण्यासाठी दहा ते बारा दिवसांपासून टॅँकर चालू आहे, परंतु ताडा वस्तीवर टॅँकर चालू होण्यासाठी आणखी दहा ते बारा दिवस वाट पहावी लागणार असल्याचे ग्रामसेवक भगवान गायके यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव सादर करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी असून, आठ ते दहा दिवसांनंतर टॅँकर ताडा वस्तीकडे सुरू होईल, असे सांगितले जाते.परिसरातील विहिरींना पाणी कमी असल्याने बऱ्याच ठिकाणांहून रिकाम्या हाताने परत फिरावे लागत असल्याने सर्व स्तरातून प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईचा निषेध व्यक्त केला जात आहे. टॅँकर मागणी करून दीड महिना उलटला तरीदेखील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी पाहणीदेखील केलेली नसून प्रस्ताव केराच्या टोपलीत टाकला की काय? असा प्रश्न ममदापूर येथील ग्रामस्थांना पडला आहे.ममदापूर ताडा वस्तीवरील लभान समाजाचे लोक दिवाळीच्या नंतर ऊस तोडीसाठी वेगवेगळ्या साखर कारखान्यांकडे जातात व ते सध्या ऊस तोडी करून आपले कुटुंब व जनावरे घेऊन आल्याने व पिण्यासाठी पाणी नसल्याने या जनावरांना कवडीमोल भावात विकण्याची पाळी येथील लोकांवर आली आहे. गावात दररोज टॅँकर येत असून, तो टॅँकर वाडी-वस्तीवर पाठवावा म्हणजे गावाबरोबर वस्तीवरच्या नागरिकांनादेखील पाणी मिळेल. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांना पिण्याच्या पाण्याचा टॅँकर कधी सुरू होणार अशी विचारणा ताडा गावात सुरू झाली आहे. आता वाडी-वस्तीवर उद्या सकाळी टॅँकर येणार एवढेच तोंडी सांगण्यात येते, मग उद्या उगवणार तरी केव्हा ? हाच प्रश्न येथील लभान बाधवांना पडला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने केव्हाही हंडा मोर्चा किंवा रास्ता रोको आंदोलन ग्रामस्थ पुकारू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तांडा वस्तीवर तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:12 AM