नाशिक : येथील पाथर्डीफाटा परिसरात एका अपार्टमेंटच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या मोटारीच्या चाकाजवळ वेटोळे घालून बसलेल्या अवस्थेत दुर्मीळ पहाडी तस्कर जातीचा सर्प रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आढळून आला.घरातील रहिवाशांनी जेव्हा बाहेरील बल्ब सुरू केला तेव्हा गाडीच्या चाकाजवळ साप बसलेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या सापाला कुठल्याहीप्रकारे असुरक्षितता निर्माण होईल, असे कृत्य न करता सावधगिरीने प्रसंगावधान राखत सर्पमित्र संस्थेशी संपर्क साधला. दरम्यान, काही वेळेतच सर्पमित्र त्या ठिकाणी पोहचले व त्यांनी सुरक्षितरित्या सापाला रेस्क्यू केले. यावेळी सदर साप हा पहाडी तस्कर जातीचा असल्याचे लक्षात आले. हा साप फारसा आढळून येत नाही. यामधील तस्कर हा साप सहसा मोकळ्या पटांगणात अथवा अडगळीच्या ठिकाणी आढळतो; मात्र पहाडी तस्कर हा तसा दुर्मीळ सर्प असून शहरी भागात अपवादानेच दिसून येतो. ग्रामिण तसेच जंगलाच्या परिसरात हा सर्प आढळतो. सध्या बदलत्या वातावरणामुळे जमिनीखाली उष्णता अधिक वाढत असल्याने सर्प बिळांमधून बाहेर येण्याचे प्रमाण वाढल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. या महिनाभरात सुमारे ४७पेक्षा अधिक सर्प रहिवाशी भागातून ‘रेस्क्यू’ करत नैसर्गिक अधिवासात मुक्क केल्याची नोंद आहे. नागरिकांनी या हंगामात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
नाशकात अपार्टमेंटमध्ये आढळला दुर्मीळ पहाडी तस्कर सर्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 8:46 PM
तस्कर हा साप सहसा मोकळ्या पटांगणात अथवा अडगळीच्या ठिकाणी आढळतो; मात्र पहाडी तस्कर हा तसा दुर्मीळ सर्प असून शहरी भागात अपवादानेच दिसून येतो. ग्रामिण तसेच जंगलाच्या परिसरात हा सर्प आढळतो.
ठळक मुद्दे सावधगिरीने प्रसंगावधान राखत सर्पमित्र संस्थेशी संपर्क महिनाभरात सुमारे ४७पेक्षा अधिक सर्प रहिवाशी भागातून ‘रेस्क्यू’