इंदिरानगर : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ संतांच्या या उक्तीप्रमाणे दुर्मिळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने बापू बंगल्यासमोरील जागेत अनोखे उद्यान उभारले असून, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु या दुर्मिळ वृक्षांची ओळख व महत्त्व पटवून देणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे. उद्यानात विविध प्रकारचे औषधी वृक्ष या ठिकाणी लावण्यात आले असून, त्यांची ओळख व्हावी म्हणून परिसरातील निसर्गप्रेमी या ठिकाणी कुटुंबासह भेटी देत असतात. वृक्षप्रेमी शा. प्र. दीक्षित व मोहन देवरे यांनी या वृक्ष मित्रमंडळाची स्थापना केली. त्याकाळी बापू बंगल्यासमोरील मोकळ्या जागेत परिसरातील नागरिक केरकचरा टाकत असल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. या मोकळ्या जागेचा दुरुपयोग थांबवण्यासाठी विविध औषध उपयोगी वृक्षांचे आणखी उद्यान साकारण्याचा संकल्प करण्यात आला अन् त्यासाठी सापुतारा, ब्रह्मगिरी यांसारख्या जिल्ह्यातील विविध जंगले व डोंगर दऱ्यातून दुर्मिळ रोपे आणून लावण्यात आली. दहा वर्षांत उद्यानाचे संवर्धन करून आज वृक्ष मोठे झाले आहेत. या वृक्षांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून देण्यासाठी त्यांच्या बुंध्याजवळ चबुतरा बांधून त्यावर त्या वृक्षाची माहिती लिहिण्यात आली होती त्यामुळे आबालवृद्धांना त्यांची ओळख होत होती. परंतु आता सदर चबुतरे हटविण्यात आल्याने दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे या उद्यानाची योग्य निगा राखण्याबरोबरच त्यांची ओळख करून देणारे माहिती फलक लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
दुर्मिळ वृक्षांची ओळख हरवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:32 AM