निफाड : येत्या आठ दिवसात रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीची निविदा काढण्याचे आश्वासन आमदार दिलीप बनकर यांनी दिल्यानंतर चार दिवसांपासून रासाका बचाव कृती समितीकडून तहसील कार्यालयासमोर नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले साखळी उपोषण शुक्रवारी (दि.४) मागे घेण्यात आले.
शुक्रवारी सकाळी १० वाजता आमदार दिलीप बनकर यांनी निफाड येथे उपोषणकर्त्यांनी भेट घेतली व येत्या आठ दिवसात कारखाना सुरू करण्याची निविदा काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नुकतीच मुंबई येथे याबाबत बैठक झाली आहे, त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती बनकर यांनी केली. त्यानंतर आमदार बनकर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते नामदेव शिंदे, हरिश झाल्टे, विकास रायते, सुयोग गिते या कार्यकर्त्यांना लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी रासाका कृती समितीचे सचिन वाघ, धोंडीराम रायते, बाबूराव सानप, दत्तू मुरकुटे, हेमंत सानप, दीपक वडघुले, अनिरुद्ध पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी प्रांत अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, रासाकाचे अवसायक राजेंद्र निकम, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष हंसराज वडघुले, पोलीस निरीक्षक रंगराव सानप, राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, सागर कुंदे, मधुकर शेलार, राजेंद्र बोरगुडे, बापूसाहेब कुंदे, सुनील निकाळे, सचिन खडताळे आदी उपस्थित होते.