नाशिक : ‘सर्वात्मका शिवसुंदरा’, ‘हळूच या हळूच’ यांसह कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विविध कवितांवर आधारित नृत्याच्या ‘रसयात्रा’ या अनोख्या कार्यक्रमात कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी सुंदर पदन्यास केला़ विशेष म्हणजे एकाच वेळी शहरातील तीन ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त दाद दिली़ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि़ वा़ शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त कीर्ती कलामंदिर या कथक नृत्य साधनेला वाहिलेल्या संस्थेने काल एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या रंगमंचावर तात्यांच्या कवितांवर आधारित नृत्याचा रसयात्रा हा अनोखा कार्यक्रम सादर करून रसिकांची वाहवा मिळवली़कालिदास कलामंदिर, सायखेडकर नाट्यगृह आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान अशा तीन ठिकाणी एकाच वेळी रसयात्रा सादर झाली़ कालिदासमध्ये मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक एज्युकेशनचे सूर्यकांत रहाळकर, श्रद्ध फाउंडेशनचे सुरेशअण्णा पाटील, महाराष्ट्र सेवा संघाचे साळी, बनकर सिक्युरिटीजचे बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ सायखेडकरमध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे, सागरमल शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम, ज्येष्ठ विधिज्ञ नंदकिशोर भुतडा हे विशेष अतिथी होते़ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला आशाताई टकले यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़चार दशकांनंतर आदिरेखा यांनी नव्या संचात काल सादर केलेल्या कार्यक्रमात ८८ सालची एक जोडी पुन्हा उतरवली होती़ कालिदासमध्ये सदानंद जोशी, सायखेडकरमध्ये आनंद प्रभू, प्रतिष्ठानमध्ये रेणुका येवलेकर यांनी सूत्रसंचालन केले़ शहरातील सर्व शाळा, कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनी आणि पालक यांचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले़कविराजांच्या अमृतमहोत्सवी वर्षात कीर्ती कलामंदिरच्या संस्थापिका रेखा नाडगौडा आणि कुमुद अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून रसयात्रेचा जन्म झाला़ बाळ भाटे यांची संगीतसाथ यात्रेला लाभली़ अपर्णा मयेकर, रंजना जोगळेकर, पद्मजा फेणाणी जोगळेकर, उत्तरा केळकर, अरुण इंगळे, त्यागराज खाडिलकर आदींनी या कविता त्यावेळी गायल्या होत्या़ खुद्द तात्यांनी या सादरीकरणास दाद दिली होती़ नंतर ८७ साली तात्यांना ज्ञानपीठ मिळाल्यावर हा कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवला गेला़ त्यानंतरही रसयात्रेचे प्रयोग होत राहिले़ नवनव्या कलाकारांना रसयात्रेतील कविता मोहवित राहिल्या़
‘रसयात्रा’ नृत्याविष्कार रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 1:11 AM
‘सर्वात्मका शिवसुंदरा’, ‘हळूच या हळूच’ यांसह कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विविध कवितांवर आधारित नृत्याच्या ‘रसयात्रा’ या अनोख्या कार्यक्रमात कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी सुंदर पदन्यास केला़ विशेष म्हणजे एकाच वेळी शहरातील तीन ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त दाद दिली़
ठळक मुद्देकीर्तीकला मंदिर : कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम