नाशिक : पाणीपुरवठ्याच्या समस्येवर बोलू दिले जात नाही म्हणून संतप्त झालेले शिवसेना नगरसेवक सुनील गोडसे यांनी सभागृहात आणलेले मडकेच संतापून फोडले, परंतु ते आपटल्यानंतर त्याचा उडालेला एक तुकडा भाजपा नगरसेविकेला लागल्याने महासभेत एकच गोंधळ उडाला. भाजपाच्या नगरसेविकांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करीत जाब विचारल्याने महासभेत भाजपा सेनेदरम्यान तुंबळ वाकयुद्ध झाले. या गोंधळामुळे महापौर रंजना भानसी यांना पंधरा मिनिटे कामकाज तहकूब करावे लागले. परंतु या कालावधीत आणि नंतरही वाद विकोपाला पोहोचू लागल्याने अखेरीस गोडसे यांना दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की आली.महापालिकेची महासभा सोमवारी (दि.९) महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. यावेळी यापूर्वीचे तहकूब विषय सोमवारी होत असलेल्या महासभेत नसल्याने त्यावरून बराच काळ भाजपा आणि विरोधकांत वाद सुरू होते. त्यानंतर मुख्य एकाच विषयावर चर्चा करण्याचा निर्णय महापौरांनी घोषित केला असताना सुनील गोडसे यांनी पाणीपुरवठ्याच्या विषयावर दोन मिनिटे बोलू देण्याची मागणी केली. नाशिकरोड येथील जयभवानी रोड परिसरात पाणीपुरवठा होत नसल्याने शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक सुनील गोडसे हे विशेष बॅनर परिधान करून बरोबर रिकामे मडके घेऊन आले होते. त्यांना महापौर भानसी यांनी बोलू दिले नाही व आता पुन्हा १३ तारखेला महासभा घेऊ त्यात बोला असे सांगितले. परंतु पाण्याचा प्रश्न जीवन-मरणाचा असल्याने त्यांना बोलू द्या, असा सेनेच्या नगरसेवकांचा आग्रह होता. सेनेचे नगसेवक यासंदर्भात उठून तावातावाने बोलू लागले. त्यानंतर महापौरांनी मोघमपणे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित भागातील अडचण सोडवावी एवढेच आदेश दिले. परंतु आपल्याला दोन मिनिटे बोलू द्या, अशी मागणी गोडसे करीत होते. महापौरांनी त्यांना परवानगी नाकारल्याने ते जागा सोडून सभागृहाच्या मध्यभागी आले आणि मडके आपटून फोडले. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. सुनील गोडसे यांना बोलू द्या, अशी मागणी शिवसैनिकांनी आक्र मकपणे केली. तर भाजपातील ज्येष्ठ हा प्रकार योग्य नसल्याचे समजावू लागले. त्यांच्यात चर्चा सुरू असतानाच भाजपाच्या नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या डोक्याला मडके फुटल्यानंतर उडालेला तुकडा लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. भाजपाच्या अन्य महिला नगरसेवकांनी त्यांना साथ देऊन आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण गोंधळ वाढला त्यामुळे भानसी यांनी १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.दरम्यान, सभा तहकूब झाल्यानंतरदेखील दोन्ही पक्षांत गोंधळ झाला. भाजपा नगरसेवक यांनी गोडसे यांनी माफी मागावी तसेच त्यांना सभागृहातून बडतर्फकरा, अशा घोषणा सुरू झाल्या. शिवसेनेचे नगरसेवकदेखील त्यांना प्रत्युत्तर देऊ लागले. गोडसे यांनी महिलांचाच पाणीप्रश्न मांडला, त्यांचा उद्देश कोणालाही मडके लागावे असा नव्हता, असे सांगितल्यानंतरदेखील गोंधळ सुरूच होता. महासभा पुन्हा सुरू झाल्यानंतर अखेरीस गोडसे यांनी माफीनामा सादर केला आणि त्यानंतर वाद मिटला....यापुढे महासभेत कोणतेही साहित्य नेण्यास बंदीमहापालिकेच्या महासभेत मडके फोडण्याच्या घटनेनंतर उद्भवलेल्या समर प्रसंगाची दखल घेत महापौर रंजना भानसी यांनी यापुढे सभागृहात अशाप्रकारची आंदोलने करण्यासाठी साहित्य आणण्यास बंदी घातली. महापालिकेत यापूर्वीदेखील काळे कपडे किंवा रिबन- मफलर घालून नगरसेवक येतात तसेच बॅनरही फडकवात. दूषित पाण्याची बाटली आणि छत्री यांसारखे साहित्य आणूनदेखील आंदोलने झाली आहेत. मात्र आता लक्ष वेधण्यासाठी अशाप्रकारचे साहित्य आणणे अडचणीचे ठरणार आहे.मी पाण्याच्या प्रश्नावर बोलण्यासाठी महापौरांकडे वेळ मागितला, मात्र त्यांनी वेळ दिला नाही. त्यामुळे मला पाण्याच्या प्रश्नावर अशी भूमिका घ्यावी लागली. परंतु माझ्या हातातील मडके निसटले आणि फुटले. त्याचे तुकडे कोणाला लागले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कुणाला दुखापत पोहोचविण्याचा कोणताही हेतु नव्हता.- सुनील गोडसे,नगरसेवक, शिवसेना
महासभेतच फोडले मडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 1:01 AM