नाशिक - मराठा आंदोलकांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. तर अनेक ठिकाणी रास्तारोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. नाशिक येथेही सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी, संयोजकांसह विविध नेते व्यासपीठावर होते. व्यासपीठावर भाषणावेळी थोडासा गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी, रसिका शिंदे या युवतीने माईक हातात घेतला. तर, शिवछत्रपतींच्या मावळ्यांना हे शोभेल काय?, असे आवाहन करत तिने भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी जमाव आंदोलक क्षणात शांत झाले. त्यानंतर तिनेही उस्फुर्त भाषण केले.
शहरातील मराठा आंदोलनासाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जमले होते. सकाळी 10 च्या सुमारास आंदोलनस्थळी मोठी गर्दी झाली. व्यासपीठावरही नेत्यांची रांग लागली. तेथे विविध नेते भाषणे करु लागले. त्यावेळी एका युवकाच्या भाषणाने गोंधळ सुरु झाला. सर्वच उभे राहिले. संयोजक सर्वांना बसण्याचे आवाहन करु लागले. मात्र, गोंधळ वाढला. तशी पोलिस व संयोजकांची चिंताही वाढली. डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर सुरु असलेल्या या आंदोलनात रसिका शिंदे या 17 वर्षीय युवतीने माईक हाती घेतला. गोंधळलेल्या परिस्थितीत भाषण करताना, शिवछत्रपतींच्या मावळ्यांना हे शोभेल काय?, असे आवाहन करत तिने भाषणाला सुरुवात केली. तिचे शब्द कानी पडताच, जमाव शांत झाला. त्यानंतर तिने उत्स्फुर्तपणे भाषण केले. तिच्या भाषणाला मराठा आंदोलकांनीही दाद दिली. दहावीच्या परिक्षेत शंभर टक्के गुण मिळविलेल्या रसिकाने मुंबईतील मराठा क्रांती मोर्चातही जबरदस्त भाषण केले होते, त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता.