उन्हाळ कांद्याला चांगला दर मिळेल या अपेक्षेने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे. मात्र, या वर्षी केंद्र शासनाने घेतलेली काळजी आणि इतर राज्यांमध्ये उपलब्ध झालेला कांदा यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली दरवाढ अद्याप झालेली नाही. चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता पावसामुळे सडण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय कांद्याच्या वजनातही घट येऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. सध्या विक्रीसाठी येणारा कांदा काहीसा काळा पडलेला असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या सरासरी दरात घसरण सुरू झाली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये सोमवारी सरासरी १,५२५ रुपये, तर चांदवड बाजार समितीत सरासरी १,३५० रुपये प्रतिक्विंटल या दराने कांदा विकला गेला, तर गोल्टाला सरासरी १,४०० रुपयांचा दर मिळाला. नांदगाव बाजार समितीमध्ये ४२४ रुपयांपासून बोली सुरू होऊन जास्तीतजास्त १,५७८ रुपये आणि सरासरी १,३८० रुपये प्रतिक्विंटल या दराने कांदा विकला गेला. कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाऊ लागली असून, कांदा खराब होऊ लागल्याने येत्या काही दिवसांत कांदा विक्रीकडे कल वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चाळीत सडण्याचे प्रमाण वाढले, वजनातही घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:32 AM