घोटी : सुरगाणा तालुक्यातील १,४०० आदिवासी बांधवांना शासनाच्या वतीने देश स्वतंत्र झाल्यापासून प्रथमच रेशन कार्ड देण्यात आले.कोरोनाच्या काळात लोकडाऊनमध्ये आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहसाठी सर्व साधने बंद झाली होती. खाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शिधापत्रिकेशिवाय शासन धान्य देत नव्हते. त्यावेळी श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेऊन आदिवासी बांधवांना रेशन कार्ड किंवा धान्य द्या, अशी मागणी केली होती, त्या लढ्यातूनच १,४०० आदिवासी बांधवांना रेशन कार्ड मिळताच नाचून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.सुरगाणा तालुक्यातील काठीपाडा, गाळबारी, बोरपाडा, हनुमंतपाडा, गाळपाडा, ऊद्यमाळा, करंजुल (क) यांसारख्या गावांतील नागरिक स्वातंत्र्य काळापासून आत्तापर्यंत शिधापत्रिकांपासून वंचित होते. आदिवासी बांधवांना लोकडाऊनच्या काळात स्वस्त धान्य दुकानातून शासनाकडून मिळत असलेल्या धान्यप्राप्तीसाठी शिधापत्रिकेची गरज भासली, परंतु शिधापत्रिका नसल्याने त्यांना धान्यास मुकावे लागले होते.अखेर श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेऊन सुरगाणा तालुक्यातील लोकांना रेशन कार्ड मिळावे, यासाठी संघटनेने गावोगावी जाऊन फार्म भरले आणि रेशन कार्डची मागणी केली होती. यासाठी अनेकदा पाठपुरावा करीत श्रमजीवी संघटनेच्या वतीने भगवान मधे, राजू राऊत, दिनेश मिसाळ, देविदास चौधरी, श्रीराम मोरे, मधुकर मोरे, किरण मोरे, दिनेश पवार, बाबुराव धूम, केशव गुंभाडे, संजय चौधरी आदींनी अनेकदा आंदोलनही केली.तरी तालुका प्रशासनाने रेशन कार्ड देण्यास विलंब केला, म्हणून मानवी हक्क दिनाच्या दिवशी १० डिसेंबर रोजी श्रमजीवी संघटनेने सुरगाणा तहसीलदार कार्यालयावर आदिवासी बांधवांना आपल्या कुटुंबासह कोंबड्या, बकऱ्या आदी जनावरे बरोबर घेऊन मुक्कामी आंदोलन केले होते. त्याची तत्काळ दखल घेत, १,४०० आदिवासींना रेशन कार्ड दिले. त्याचे सोमवारी (दि.२८) वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी बांधवांनी एकच जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.
स्वातंत्र्यांनतर प्रथमच मिळाले रेशन कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 4:11 PM
घोटी : सुरगाणा तालुक्यातील १,४०० आदिवासी बांधवांना शासनाच्या वतीने देश स्वतंत्र झाल्यापासून प्रथमच रेशन कार्ड देण्यात आले.
ठळक मुद्देसुरगाणा तालुक्यात आनंदोत्सव : श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाचे फलित