रोहन वावधानेमानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कचा मागील तीन ते चार वर्षांपासून बोजवारा उडाला असून, नेटवर्कचा तिढा सुटता सुटत नसल्याने आता मानोरीत रेशन दुकानदारांना देखील नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला असल्याने रेशन वितरण करण्यास नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला आहे. ऑनलाइन कामांमुळे पारदर्शकता निर्माण व्हावी या हेतूने सर्वत्र ऑनलाइन कामांना वेग आला आहे, त्यामुळे रेशन दुकानातील कामे देखील सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत; मात्र मानोरीत नेटवर्क नीट मिळत नसल्याने मानोरीतील रेशन दुकानदारांना दुकानापासून जवळ असलेल्या हनुमान मंदिराच्या छतावर जाऊन उंच जागेचा आसरा घेत आपले ऑनलाइन कामकाज पूर्ण करावे लागत आहे.मागील तीन ते चार वर्षांपासून मानोरी बुद्रुक येथे कोणत्याही मोबाईल कंपन्यांच्या कार्डला नेटवर्क मिळत नसून मोबाईलधारकांनी मानोरी येथे नवीन टॉवर उभारण्याची अनेकदा मागणी केली आहे. कोणतीही नेटवर्क कंपनी त्याकडे लक्ष देत नसून, संबंधित कंपनीच्या सुस्त कारभारामुळे अद्यापही येथील नेटवर्कचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने मोबाईल धारकांनी सर्वच कंपन्यांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.मोबाईल कंपन्यांच्या डोळेझाकपणामुळे काही दिवसांपूर्वी मानोरीतील काही तरुणांकडून सर्व सिमकार्डची होळी करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता, मात्र त्या मागणीवर एकाही मोबाईल कंपनीने प्रतिक्रिया न दिल्यामुळे ऑनलाइन कामांच्या अडचणीत अजूनच वाढ होताना दिसत आहे. सर्वत्र ऑनलाइन कामांना वेग आलेला आहे, मात्र मानोरी बुद्रुक परिसरात मागील चार वर्षांपासून नेटवर्कचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांनी मागणी करून देखील कोणत्याही कंपनीचा टॉवर मानोरीत उभा करण्यास कंपनी तयारी दाखवत नाही. त्यामुळे मोबाईलधारक प्रचंड नाराज आहेत.नेटवर्कअभावी महागडे रिचार्ज वाया जात असल्याची माहिती मोबाइलधारकांनी दिली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठीही सध्या नेटवर्कची अत्यंत गरज भासत असते, विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी उंच जागेचा आसरा घ्यावा लागत आहे. नेटवर्क अभावी ग्रामपंचायतीचे देखील अनेक ऑनलाईन कामकाज वेळेत पूर्ण करण्यासाठी शेजारच्या देशमाने आणि मुखेड येथील ग्रामपंचायतमध्ये जाऊन कामकाज पूर्ण करावे लागत आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीने का होईना मानोरी बुद्रुक येथे पाहणी करून नवीन टॉवर उभा करून नेटवर्कचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मोबाईलधारक, ग्रामपंचायत तसेच सर्व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
नेटवर्कसाठी रेशन दुकानदारांनाही घ्यावा लागतोय मानोरीत उंच जागेचा आसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 10:41 PM
रोहन वावधाने मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कचा मागील तीन ते चार वर्षांपासून बोजवारा उडाला असून, नेटवर्कचा तिढा सुटता सुटत नसल्याने आता मानोरीत रेशन दुकानदारांना देखील नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला असल्याने रेशन वितरण करण्यास नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देसिमकार्डची होळी करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता,