मोफत धान्य वाटप : शहरातील दुकानदार वंचित
नाशिक : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र शासनाने गोरगरिबांना रेशन दुकानदारांच्या माध्यमातून मोफत धान्यांचा पुरवठा केला. या धान्यवाटपासाठी दुकानदारांना देण्यात येणाऱ्या बिलवाटपात विलंब होत असल्याने दुकानदारांमध्ये नाराजी आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मागील वर्षी कोरोनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना मोफत धान्याचा पुरवठा करण्यात आला होता. यासाठी दुकानदारांनी नियमित धान्याचे वाटप करण्याबरोबरच मोफत धान्याचेही
वाटप केले होते. प्रत्येकी एका क्विंटलसाठी १५० रुपये याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार रेशन दुकानदारांना बिलाची प्रतीक्षा होती; परंतु अनुदान प्राप्त होत नसल्याने बिल कधी मिळेल याची चिंता त्यांना लागली होती. परंतु आता निधी प्राप्त होऊनही त्याचे नियमित वाटप होत नसल्याने शहरातील तसेच काही तालुक्यांमधील दुकानदार अजूनही प्रतीक्षेत आहेत.
नाशिक जिल्ह्यात सुमारे अडीच हजार रेशन दुकानदार असून, शहरात सुमारे अडीचशे दुकानदार आहेत. ग्रामीण भागातील काही दुकानदारांना मोफत धान्याचे बिल मिळाले आहे, तर काहींना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रेशन दुकानदारांकडून सातत्याने विचारणा केली जात आहे. मात्र त्याबाबत पुरेशी माहिती पुरवठा विभागाकडून दिली जात नसल्याची दुकानदारांची तक्रार आहे.
कोरोनाच्या काळात मोफत धान्याचा पुरवठा करण्यात आला. रेशन दुकानदारांनी जीव धोक्यात घालून शासनाच्या या मोहिमेला सहकार्य केले. या काळात अनेकांना कोरोनाची लागण झाली. काही लोक दगावले गेले. रेशन दुकानदारांनी केलेल्या सहकार्याची आठवण ठेवून त्यांना पुरेपूर लाभ मिळवून देण्यात यावा, अशी मागणी रेशन दुकानदारांकडून करण्यात आली आहे.
---कोट--
मोफत धान्यपुरवठा वाटपासाठी देय असलेले अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले असून, काही तालुक्यांना वाटप झालेले आहे. उर्वरित दुकानदारांनाही लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी पुरवठा विभागाने प्रयत्न करावा. संघटनेच्या माध्यमातूनही प्रयत्न केला जाईल.
- निवृत्ती कापसे, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना.