नाशिक : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे रेशन दुकानदारास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नाशिक शहरातील रेशन दुकानदारांनी कडकडीत बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आधार सिडींगचे वर्षानुवर्षे काम रेंगाळल्यामुळे ग्राहक दुकानदारांशी वाद घालत असून, त्यामुळेच अशा घटना घडत असल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत आधार सिंडींगचे काम करावे तो पर्यंत पॉश मशिनचे धान्य वाटपाचा आग्रह धरू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.रेशन दुकानदाराने आधार कार्ड मागितल्यामुळे रेशन दुकानदार गणेश तिवारी यांना कार्डधारक इब्राहिम खान याने बेदम मारहाण केली. शासनाच्या निर्देशावरूनच दुकानदाराने आधारकार्डाची मागणी केली होती. परंतु कार्डधारकाने त्यांना मारहाण केल्याने सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच तिवारी कुटुंबियाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, नुकसानभरपाई देण्यात यावी अशी अशी मागणी करीत जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाºयाची भेट घेऊन निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मालेगाव येथील घटनेने रेशन दुकानदारांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले असून, सन २००५, २००९,२०११,२०१६ असे चार वेळा दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांची अचूक व इंत्यभुत माहितीचे फार्म भरून घेतले व वेळोवेळी कार्यालयात जमा केले आहे. सदर कामाचे कोणतेही मानधन दुकानदारांना मिळालेले नाही. अनेक वेळा आधारकार्डाची माहिती गोळा करून दिलेली असतानांंही ती व्यवस्थित आॅनलाईन भरल्यामुळे दुकानदारांचा रोष नसतानाही त्यांना कार्डधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पॉस मशीन मधील त्रुटीमुळेही दुकानदारांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांची माहिती सादर केली आहे. आधार सिडींगचे काम करताना चुका झाल्याचे वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेले आहे. आधार सिडींगचे काम पुर्ण व अचूक होईपर्यंत पावतीने धान्य वाटपाची परवानगी द्यावी तसेच मालेगावसारखी घटना घडू नये म्हणून आधारसिडींगे काम स्वतंत्र यंत्रणेमार्फत करून ते पुर्ण झाल्यानंतरच पॉस मशिनने धान्य वाटप करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाअध्यक्ष निवृत्ती कापसे, सतिष आमले, दिलीप तुपे, महेश सदावर्ते, रतन काळे, खंडेराव पाटील, गणेश कांकरिया, राजु लोढा, दिलीप मोरे, युसूफ खान, सुनील कर्डक, फिरोज सय्यद, बाळासाहेब मते, पंकज कुलकर्णी, गौरी अहेर, आदी सहभागी होते