नाशिक : रेशन दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याकडे सुपूर्द केले असल्याने पुरवठा खात्याकडून जो पर्यंत संपुर्ण आधारसिडींगचे काम पुर्ण होत नाही, तो पर्यंत रेशन दुकानदारांनी ‘ईपॉस’ यंत्राच्या सहाय्याने धान्य वितरणाची सक्ती करू नये असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी रेशन दुकानदारांच्या संघटनेला दिले आहे. नाशिक जिल्ह्यातील काही रेशन दुकानदारांना जिल्हा पुरवठा कार्यालयाने ‘ईपॉस’यंत्राचा वापर न केल्याबद्दल परवाना रद्द करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत, त्या पार्श्वभुमीवर बापट यांची सुचना महत्वाची मानली जात आहे.नाशिक जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे ७० टक्के आधार क्रमांक गोळा करून ते संगणकात भरण्यात आले असून, अजुन ३० टक्के काम अपुर्ण आहे अशा परिस्थितीत पुरवठा खात्याकडून सर्वच रेशन दुकानदारांना ईपॉस यंत्र पुरविण्यात येवून धान्य वितरणासाठी यंत्राचा वापर केला जावा असा आग्रह धरला जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून काही दुकानदारांनी त्याचा वापरही सुरू केला असला तरी, काही यंत्रे नादुरस्त झाली तर काही ठिकाणी पुरेसे आधारसिडींग न झाल्यामुळे यंत्र वापरण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत पुरवठा खात्याकडून ईपॉस यंत्राचा सक्तीने वापर करण्यासाठी रेशन दुकानदारांना नोटीसा देण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील काही दुकानदारांना देण्यात आलेल्या नोटीसांमध्ये परवाना का रद्द करू नये अशी विचारणा करण्यात आली आहे. काही दुकानदारांनी या नोटीसांना उत्तरे देतांना ईपॉस यंत्राबाबतच तक्रारी केल्या आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील असाच प्रकार सुरू झाल्याने बुधवारी रेशन दुकानदारांच्या संघटनेने मुंबईत अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली. आधार सिडींग झालेले नसताना ईपॉस यंत्र वापरण्याची सक्ती न करण्याची विनंती केली. तसेच द्वारपोच धान्य देण्यात यावे अशी मागणी केली. त्यावर बापट यांनी तसे आदेश संबंधितांना दिले आहेत. बापट यांच्या आदेशामुळे रेशन दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आधार सिडींग शिवाय रेशन दुकानदारांना ‘ईपॉस’ची नाही सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 3:22 PM
नाशिक जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे ७० टक्के आधार क्रमांक गोळा करून ते संगणकात भरण्यात आले असून, अजुन ३० टक्के काम अपुर्ण आहे अशा परिस्थितीत पुरवठा खात्याकडून सर्वच रेशन दुकानदारांना ईपॉस यंत्र पुरविण्यात येवून धान्य वितरणासाठी यंत्राचा वापर केला जावा असा आग्रह धरला जात आहे.
ठळक मुद्देगिरीष बापट : रेशन दुकानदारांना आश्वासन जिल्हा पुरवठा कार्यालयाने ‘ईपॉस’यंत्राचा वापर न केल्याबद्दल परवाना रद्द करण्याच्या नोटीसा बजावल्या