नाशिक : आजची पिढी ही आधुनिक युगात जगणारी असून, या पिढीचा अधिकाधिक संबंध हा माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांशी येतो. पालकांनी मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा व दोष देणे टाळावे, असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे सदस्य रत्नाकर महाजन यांनी केले. शहरातील सागर क्लासेसच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त परशुराम सायखेडकर सभागृहात आयोजित गुणवंतांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी महाजन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर गुरुमित बग्गा, क्लासचे संचालक प्रा. सुनील रुणवाल, अण्णासाहेब नरुटे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाजन म्हणाले, आजची मुले आपल्या कुटुंबापेक्षा मित्र-मैत्रिणींशी अधिक वेळ संवाद साधणे पसंत करतात. मुलांवर पालकांनी केवळ बंधने लादण्याचा प्रयत्न न करता त्यांचे मित्र बनून त्यांच्याशी सुसंवाद साधावा. मुलांनीदेखील पालकांच्या भावना समजून घेत आपली संस्कृती अधिकअधिक जोपासावी. आजची पिढी ही अनुकरण करणारी असून, पालकांनी विशेष लक्ष ठेवावे, असे ते म्हणाले. सागर क्लासेसच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोफत शिक्षण योजना’ राबविणार असून, या वर्षामध्ये क्लासच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी २५ महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस रुणवाल यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केला. दरम्यान, अशोकस्तंभ, त्रिमूर्ती चौक, सातपूर, सिडको, मेरी, इंदिरानगर या शाखांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकूण २३१ गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
दोष देण्यापेक्षा मुलांना समजून घ्यावे रत्नाकर महाजन : सागर क्लासेसचा गुणगौरव सोहळा; २३१ विद्यार्थ्यांचा गौरव
By admin | Published: December 15, 2014 1:36 AM