नाशिक : मंत्रालयातील उंदीर प्रकरण गाजत असतानाच पंचवटी एक्स्प्रेसमध्येदेखील उंदरांच्या उपद्रवाचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या एका प्रवाशाला उंदीर चावल्यामुळे रेल्वे डब्यात उंदरांची संख्या वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्लॅटफॉर्मवर उंदीर असल्याचा प्रवाशांचा अनुभव असला तरी आता डब्यात उंदीर शिरल्याने प्रवाशांची झोप नक्कीच उडाली आहे. मनमाड स्थानकातून निघालेल्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांचा समावेश असतो. रोज सकाळी मुंबई गाठणे आणि रात्री पुन्हा पंचवटीनेच घरी परतणे अशी कसरत चाकरमान्यांना करावी लागते. त्यामुळे सकाळी प्रवास करताना बहुतेक प्रवासी हे नाशिकरोड ते इगतपुरी, कल्याणपर्यंत थोडीशी झोप घेण्याचा प्रयत्न करतात. शुक्रवारी पंचवटी एक्स्प्रेसने नाशिकरोड स्थानक सोडल्यानंतर मनमाडचे दैनंदिन प्रवासी रशीद शेख हे झोपलेले असताना त्यांच्या पायाला उंदराने चावा घेतला. ही बाब एका महिलेने इतर प्रवाशांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उंदीर हाकलण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागली. सैरावैरा धावणाºया उंदरामुळे काहीकाळ हास्यकल्लोळही उडाला. मात्र शेख यांच्या पायातून रक्त निघेपर्यंत उंदराने पाय कुरतडल्याचे दिसून आले. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. नाशिकहून मुंबईकडे जाणाºया पंचवटी तसेच गोदावरी एक्स्प्रेसमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उंदीर आढळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. कित्येकदा उंदीर प्रवाशांच्या बॅगांमध्येदेखील शिरले आहेत. त्यामुळे उंदरांना हाकलण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. उंदरांच्या भीतीने आता रेल्वेचा प्रवासदेखील आरामदायी राहिला नसल्याचे बोलले जात असून, उंदरांच्या भीतीने झोप घेणारे प्रवासीही धास्तावले आहेत. स्थानकावरील उंदीर मारण्यासाठी कोणतेही कंत्राट काढले जात नसल्यामुळे रेल्वेस्थानकावर उंदरांची संख्या वाढल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच स्थानकावरील प्रवाशांनी येथील स्टेशन मास्तरकडे उंदरांच्या उपद्रवाबद्दल तक्रार केली होती. उंदीर घालविण्यासाठीची उपायोजनाच नसल्याने अधिकाºयांनी हतबलता दर्शविली. रेल्वेस्थानक आणि रेल्वे डब्यातील स्वच्छतेबाबत अनेकदा केंद्रीय पातळीवर कंत्राट दिले जाते. सदर कंत्राट केवळ प्लॅटफॉर्म धुण्यापुरतेच मर्यादित असते.
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये उंदरांचा उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:04 AM