नाशिक : शिवसेनेत संघटनात्मक बदलानंतर उफाळून आलेली गटबाजी कायम असून, नवनियुक्त पदाधिकारी सत्कार आणि विधान परिषदेच्या व्यूहरचनेसंदर्भात बोलावण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीस नगरसेवकांच्या एका गटाने ठेंगा दाखवला. उत्तर महाराष्टचे संपर्कप्रमुख असलेल्या खासदार संजय राऊत यांनी सदरची बैठक बोलावली होती. मात्र, त्यांनी पत्रकार परिषदेत सारवासारव करताना बैठकीस नगरसेवकांना बोलावलेच नसल्याचे सांगत शिवसेनेत सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला. दुसरीकडे पक्षातील काही जण हे माध्यमांना हाताशी धरून पक्षाच्या विरोधात बातम्या पेरत असल्याचा आरोप केल्याने गटबाजीला त्यांच्याकडूनच अप्रत्यक्षरीत्या पुष्टीही मिळाली. खासदार राऊत यांच्या दौऱ्याचे निमंत्रण देतानाच शिवसेनेच्या वतीने शिवसेना कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीचे व नवीन पदाधिकाºयांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आल्याचे व्हॉट्सअॅप संदेशात नमूद करण्यात आले होते. माध्यमांनादेखील हीच माहिती देण्यात आली होती. तथापि, बुधवारी (दि. २५) मात्र खासदार राऊत यांनी नगरसेवकांना बोलावलेच नसल्याचा दावा केल्याने नगरसेवक हे लोकप्रतिनिधी नव्हेत काय, असाही प्रश्न शिवसेनेतूनच केला जात आहे. सदरच्या बैठकीसाठी मंगळवारी नगरसेवकांना दूरध्वनी करण्यात आले, त्याचवेळी नगरसेवकांच्या नाराजीमुळे ते बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. आणि प्रत्यक्षात घडलेही तसेच. बुधवारी (दि. २५) सकाळी झालेल्या बैठकीस महापालिकेत निवडून आलेल्या ३५ नगरसेवकांपैकी अवघे पाच जण उपस्थित होते, असे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे दुपारी खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी या विषयावरून विचारणा केल्यानंतर त्यांनी ही नगरसेवकांची नव्हे तर केवळ पदाधिकाºयांची बैठक होती, असा दावा केला. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठक असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था हा वेगळा मतदारसंघ असतो अािण त्याचे निकषही वेगळे असतात. त्यासंदर्भात नगरसेवकांची बैठक स्वतंत्ररीतीने घेतली जाते, असेही ते म्हणाले. विधान परिषदेसाठी पक्षाने नरेंद्र दराडे यांची अधिकृतरीत्या घोेषणा केली आहे. सध्या पक्षाचे २१२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आहेत. मात्र प्रत्यक्षात चारशे मते पक्षाच्या उमेदवाराला मिळतील, असा दावाही त्यांनी केला.
राऊत यांच्या बैठकीला नाराज गटाचा ठेेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:58 AM