नाशिक : शिवसेनेतून आपली हकालपट्टी करण्यामागे खासदार संजय राऊत यांचे षडयंत्र असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी माझी दावेदारी असताना राऊत यांनी आर्थिक तडजोड करून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देऊ केली, असा आरोप करून शिवसेनेचे अॅड. शिवाजी सहाणे यांनी असे असले तरी, आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवूच, असा दावा केला.‘सामना’ या मुखपत्रातून सोमवारी पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून सहाणे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यापा र्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने सहाणे यांना विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी करण्याची गळ घातली. त्या प्रीत्यर्थ सहाणे यांनी पत्रकार परिषदेत उपरोक्त आरोप केले. आपली पक्षाबद्दल व पक्षाच्या नेत्यांबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे सांगून सहाणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. जे सेना संपवायला निघाले आहेत त्यांच्याविषयी आपली तक्रार कायम राहील, असे सांगितले. विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी गेल्या महिन्यापासून आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वेळ मागत आहोत, परंतु आपल्याला त्यांनी भेट दिली नाही. त्यामुळे दिल्लीत येथे जाऊन खासदार राऊत यांना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी मुंबईत सेना भवन येथे आपल्याला भेटण्यासाठी बोलाविले, त्यांची भेट घेतली असता त्यांनी उमेदवारी मिळणार नसल्याचे आपल्याला सांगितले. त्यामागे पक्ष विरोधी कारवाया केल्याचा दाखला दिला. परंतु त्यातील खरी बाब अशी आहे की, राऊत यांनी आर्थिक तडजोडी करून विधान परिषदेची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना विकली व येत्या दोन, तीन दिवसांत आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्याचा भंडाफोड करू अशा भीतीपोटी राऊत यांनी घाईगर्दीत आपली हकालपट्टी केली. राऊत हे कॅन्सरप्रमाणे शिवसेनेला कुरतडत असून, विरोधी पक्षांची सुपारी घेऊन शिवसेनेचा उमेदवार पाडण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे. तसेच ते कोणाचे मानसपुत्र आहेत, हे सर्वांनाच माहिती असल्याची टीकाही सहाणे यांनी केली. गेल्या निवडणुकीत सेनेचे ७० सदस्य असताना आपल्याला २२५ मते मिळाली त्यावेळी आपल्यासाठी कष्ट घेतलेल्यांनी अश्रू गाळले त्याचा बदला घेण्यासाठी आपण विधान परिषदेची निवडणूक लढवणार असून, सर्वच पक्षांचा पर्याय आपण खुला ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले. राऊत यांनी आपल्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही शेवटी सहाणे यांनी दिले.राऊत, भुसे, नार्वेकर यांचा काय संबंध?आपल्या उमेदवारीबाबत राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली असता, त्यांनी उमेदवारी मिळणार नसल्याचे सांगितले, तर ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनीदेखील नकारच दिला. माझ्या उमेदवारीचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हेच घेणार असल्याने या तिघांचा काय संबंध? असा सवाल करून सहाणे यांनी, उद्धव ठाकरे यांना संजय राऊत, मिलिंद नार्वेकर या बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला.
आपल्या हकालपट्टीमागे राऊत यांचे षडयंत्र : शिवाजी सहाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:46 AM