कळवण तालुक्यातील पुणेगाव येथील स्वस्त धान्य दुकानादाराकडून मोफत धान्याची विक्री केल्याचे प्रकरण ताजे असतांना रवळजी येथील
स्वस्त धान्य दुकानात मे महिन्यासाठी
प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आलेले धान्य ३४ अंत्योदय व २७७ प्राधान्य कुटुंबीयांतील लाभार्थ्यांना वाटप झाले नसल्याचे पुरवठा निरीक्षकांना चौकशीत निदर्शनास आले असून शिल्लक धान्य दुकानात आढळून आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारीवरून स्वस्त धान्य दुकानाचा पंचनामा करून सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मदतीचे हात ग्रामीण व आदिवासी भागाकडे सरसावत होते. महाविकास आघाडी सरकारने मोलमजुरी करणाऱ्या गोरगरिबांना मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी झाली. परंतु कळवण तालुक्यात मोफत धान्याची विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणेगाव नंतर रवळजी येथील दुकानाच्या तक्रारीबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून चक्रपाणी महिला बचत गट स्वस्त धान्य दुकान चालवीत आहे. त्यांनी स्थानिक ग्रामस्थास दुकान चालविण्यास दिले असून ते शिधापत्रिका धारकांना दर महिन्याला पाच किलो धान्य कमी देतात. ऑनलाईन यादीत नाव असताना लाभार्थ्यांना धान्य देत
नाही, विचारणा केली तर दमबाजी करतात. लाभार्थी स्वप्नील वाघ यांनी धान्य कमी मिळाल्याने विचारणा केली तर त्यांना मारहाण करण्यात आली. वरिष्ठ यंत्रणेचा आशीर्वाद असल्याच्या अविर्भावात दुकानदार लाभार्थ्यांना वागणूक देत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. दुकानाच्या प्राप्त तक्रारी व निवेदनावरून पुरवठा निरीक्षक रमेश गायकवाड यांनी बुधवारी (दि. ९) चौकशी केली असता दुकानात धान्य उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोट....
दर महिन्याला या दुकानातून मोठा धान्य घोटाळा होतो. शिधापत्रिका धारकांना युनिटप्रमाणे संख्येनुसार धान्य मिळत नाही. चक्रपाणी महिला बचत गट कागदोपत्री असून हे दुकान अन्य व्यक्ती चालवून यंत्रणेची फसवणूक केली जात आहे. शिधापत्रिकाधारकांच्या धान्याची अन्यत्र विक्री होत असल्याने गोरगरीब जनतेवर अन्याय होत आहे. सदर व्यक्तीविरोधात कारवाई करावी.
- बबन वाघ, ग्रामस्थ, रवळजी
कोट....
रवळजी येथील स्वस्त धान्य दुकानासंदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या.
दुकानाची तपासणी केली असता मे महिन्यात ३४ अंत्योदय व २७७ प्राधान्य कुटुंबीयांतील शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले नसल्याचे आढळून आले. त्यांचे शिल्लक धान्य दुकानात दिसून आले नाही. चौकशी करून कारवाई केली जाईल. तूर्त दुकानाला सील लावण्यात आले आहे.
- रमेश गायकवाड,
पुरवठा निरीक्षक, कळवण