मालेगाव : शासनाचे कोरोनाच्या नियमांचे पालन करीत परंतु अत्यंत उत्साहात निवडक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दसरा मैदानावर शुक्रवारी (दि.१५) रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास रावणाचे दहन करण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपूर्वी आझाद चौकातील विठ्ठल मंदिरापासून सजविलेल्या ट्रॅक्टरवर राम, लक्ष्मण आणि हनुमान यांची जल्लोषात सवाद्य मिरवणूक निघत असे; मात्र यंदा विठ्ठल मंदिरापासून रिक्षात राम, लक्ष्मण आणि हनुमानाला बसवून किल्ला हनुमान दर्शनासाठी गेले. तेथून महालक्ष्मी मंदिर, चंदनपुरीगेट हनुमान मंदिर आणि शेवटी महालक्ष्मी चौकात मरीमाता मंदिरात दर्शन घेऊन जय श्रीरामच्या घोषणा देत दसरा मैदानाकडे पायी मिरवणूक काढण्यात आली. प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोजक्या ५० पासधारकांना रावण दहन कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात आला. शेवटी जल्लोषात व शांततेत रावण दहन करण्यात आले. यावेळी उपमहापैार नीलेश आहेर, प्रमोदा शुक्ला, प्रवीण पाटील, माधवराव जोशी, हरिप्रसाद गुप्ता, रियाज अन्सारी, केवळ हिरे यांचेसह विजयादशमी उत्सव समितीचे अध्यक्ष शीतल पवार, कार्याध्यक्ष शरद पाटील, विकी शर्मा, सचिव रमेश चौधरी, विजय चौधरी उपस्थित होते.