नाशिक : रवि पाटील, तुम्ही असाल तेथून परत या. महापालिकेशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच सोडवू, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांना केले आहे. दरम्यान, महापौरांनी मंगळवारी (दि.२९) पाटील कुुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला, तर पोलीस आयुक्तांचीही भेट घेऊन तपासाला गती देण्याची विनंती केली. महापालिकेतील नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील गेल्या शनिवार (दि.२६) पासून बेपत्ता आहेत. त्यांनी पाठीमागे ठेवलेल्या चिठ्ठीमुळे त्यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढले आहे. पाटील यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झालेली आहेत मात्र, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. त्यामुळे पाटील कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आहे. मंगळवारी (दि.२९) महापौर रंजना भानसी यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी, महापौरांनी पत्रकारांशी बोलताना रवि पाटील हे जेथे कुठे असतील, त्यांनी तेथून परत यावे, असे आवाहन केले. महापालिकेशी संबंधित त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडविले जातील, परंतु त्यांनी आपल्या कुटुंबीयासाठी टोकाचे पाऊल उचलू नये, असेही महापौरांनी सांगितले. महापालिकेतील अन्य कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांचीही दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, महापौरांनी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांची भेट घेऊन तपासाच्या प्रगतीबद्दल चर्चा केली. यावेळी, पोलीस आयुक्तांनी तपासासाठी पोलीस पथके पाठविली असून, नातेवाइकांसह सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात असल्याचे सांगितले. यावेळी, महापौरांसमवेत स्थायी समिती सभापती हिमगौरी अहेर, नगरसेवक भगवान दोंदे उपस्थित होते.आयुक्तांच्या माजी पीएची पोस्टआयुक्त कार्यालयात यापूर्वी स्वीय सचिव म्हणून काम पाहणाºया कैलास दराडे यांनी सोशल मीडियावर कर्मचाºयांना आवाहन करणारी एक पोस्ट टाकली आहे. गेल्या सिंहस्थापासून मनपातील अधिकारी-कर्मचारी हे खरोखरच प्रचंड तणावाखाली काम करत असल्याचे सांगत दराडे यांनी आपले सहकारी ठाकरे आणि प्रवीण राजपूत यांचे आजारपणामुळे झालेल्या आकस्मिक मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. तणावाची स्थिती असली तरी स्वत:कडे दुर्लक्ष करू नका, आनंदी रहा, असे सांगत रवि पाटील लवकरच परत येतील, अशी आशा व्यक्त केली आहे.आसू आणि हसूरवींद्र पाटील यांची कन्या भाग्येशा सिम्बॉयसीस स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, तिने इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. मंगळवारी सीबीएससी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात भाग्येशाने ८७ टक्के गुण संपादन केले. परंतु, एका डोळ्यात आसू आणि दुसºया डोळ्यात हसू अशी स्थिती अनुभवणाºया चिमुरड्या भाग्येशाला दहावीच्या निकालाचा आनंद घेता आला नाही. सोमवारी (दि.२८) भाग्येशाचा वाढदिवस होता, तर मंगळवारी (दि.२९) दहावीचा निकाल. या दोन्ही आनंदाच्या क्षणी पप्पांचा फोन येईल, या आशेने भाग्यश्री प्रतीक्षा करत होती. परंतु, काहीच प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आहे.कामाचा ताणरवि पाटील यांच्या पत्नी शीतल यांनी म्हटले आहे, गेल्या काही दिवसांपासून अति कामामुळे ते तणावात होते. नवीन आयुक्त आल्यापासून त्यांच्या कामाचा ताण वाढला होता. शनिवारी (दि. २६) वॉक विथ कमिशनरला जायचे म्हणून ते सकाळी लवकर उठले. सोमवारी मुलीचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तरी त्यांचा फोन येईल याची आम्ही वाट पाहत होतो असे सांगितले.
रवि पाटील, असाल तेथून परत या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:55 AM