सटाणा : तालुक्यातील आराई येथील गोरल्या नाला पाझर तलावात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारपासून (दि.२८) येथील तहसील आवारात पुन्हा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.आराई येथील गोरल्या नाल्यावर शासनाने सन १९९५-९६ मध्ये पाझर तलाव बांधला होता. या तलावासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन मात्र संबंधित विभागाने १५ फेब्रुवारी, २००० मध्ये केल्याचे आढळून आले आहे. प्रत्यक्षात मात्र, या जमिनी पाझर तलाव बांधल्यापासून कसता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. शासन नियमानुसार पाच वर्षांच्या आत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला अदा करणे बंधनकारक असताना भूसंपादन करून वीस वर्षांचा कालावधी लोटला आहे. शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही अद्याप मोबदला मिळाला नाही. संबंधित विभागाने नवीन भूसंपादन कायदा २०१३, नियम २०१४ अन्वये नव्याने मूल्यांकन करून व्याजासह मोबदला द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये नरेंद्र सोनवणे, अरुण सोनवणे, काकाजी देवरे, दिगंबर सोनवणे, विजय सोनवणे, गोकुळ सोनवणे, सुरेश देवरे, माधव देवरे, बाळासाहेब देवरे, दत्तात्रेय देवरे, नामदेव सोनवणे यांचा समावेश आहे.तोंडाला पाने पुसलीशेतकऱ्यांनी १६ ऑगस्ट, १०१९ रोजी बेमुदत उपोषण सुरू केले होते. २० ऑगस्ट, २०१९ रोजी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी ३१ मार्च, २०२० अखेरपर्यंत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर, उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, आजपर्यंत शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला मिळाला नाही. तोंडाला पाने पुसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.