आडगाव : आडगाव शिवारात दहावा मैलजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला व अवघ्या काही मिनिटांत बस आगीत भस्मसात झाली होती. या बसमध्ये जवळपास बारापेक्षा अधिक प्रवासी होते. अचानक लागलेल्या आगीमुळे हातात असेल तेवढेच समान घेऊन प्रवासी बसमधून सुखरूपपणे बाहेर पडले असले तरी काही प्रवाशांचे मोबाइल गहाळ झाले तर काहींचे चप्पल, बूटदेखील जळून खाक झाले. त्यामुळे दोन अडीच तास ताटकळत जीव मुठीत धरून अनवाणी पायाने प्रवासी सकाळी घरी पोहचले. नाशिक-इंदूर या मार्गावरील शिवशाही बस रविवारी रात्री आडगाव शिवारात अचानक आग लागून भस्मसात झाली. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे साहित्य आगीत जळून खाक झाले. या बसमधील बहुतांशी प्रवासी दिवाळीची सुट्टी असल्याने नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते तर काही त्र्यंबकेश्वर, पंचवटी आणि शिर्डी येथे देवदर्शनाच्या निमित्ताने आले होते. या दरम्यान त्यांनी खरेदी केलेला प्रसाद, मौल्यवान वस्तू, कपडे सोबत होते. परंतु बसला लागलेल्या आगीमुळे त्यांना जीव वाचविण्यासाठी आपल्या जवळील किमती सामानावर पाणी सोडावे लागले. आगीतून सर्व प्रवासी बाहेर पडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. आग विझविण्यासाठी तासाचा कालावधी लोटला. या काळात सर्व प्रवाशांची तिकिटे, माहिती व साहित्याची माहिती घेऊन स्थानिक पोलिसांनी पंचनामा केला.या काळात कुटुंबासह असलेल्या महिला प्रवाशांना रात्री दोन-अडीच तास हायवेवरच काढावे लागले. त्यानंतर पर्यायी दुसºया शिवशाही बसमधून या प्रवाशांची सोय करण्यात आली असली तरी, शिवशाही बसचा नुकताच आलेल्या अनुभवाचा विचार करता, नवीन बसमध्ये बसल्यानंतरही प्रवाशांनी सुरक्षेची प्रार्थना करत जीव मुठीत धरून रात्रीचा पुढील प्रवास केला.आग प्रकरणाची चौकशी करणारशिवशाही बसच्या इन्व्हटर पॅनलला लागलेल्या आगप्रकरणाची तज्ज्ञांमार्फत चौकशी केली जाणार आहे. प्रथमदर्शनी आग लागल्याचे कारण दिसत असले तरी भविष्यात अशा प्रकारे दुर्घटना घडू नये यासाठी या घटनेची चौकशी केली जाईल. सदर बस ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर महामंडळाच्या सेवेसाठी चालविली जात होती. या चौकशीत चालकासह बसेसच्या तांत्रिक बाजूदेखील पडताळून पाहिल्या जातील, असे महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी अरुण सिया यांनी सांगितले.आम्ही कुटुंबासह नाशिकला फिरण्यासाठी आलो होतो. रात्रीची बुकिंग असल्याने बसमध्ये आनंदात बसलो. पण अवघ्या काही मिनिटांत झालेल्या अपघातामुळे आम्ही घाबरलो. चप्पल, बूट आणि सोबत असलेले सर्व समान जळून खाक झाले. दुसºया बसमध्ये बसल्यानंतरदेखील धाकधूक वाटत होती पण सकाळी अनवाणी पायाने सुखरूप घरी पोहचलो. - सुनील सोळंकी, प्रवासी
जीव मुठीत धरून अनवाणी पायाने प्रवासी पोहचले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:16 AM