नाशिक : शोषित, उपेक्षितांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणि हक्काची ऊर्जा निर्माण करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील अंधारात असलेल्या कुटुंबाच्या घरात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश’ योजनेद्वारे वीजजोडणी पोहोचणार आहे. १४ एप्रिलपासून या योजनेची सुरुवात होणार असून ६ डिसेंबरपर्यंत योजना सुरू राहाणार आहे.
१४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त राज्यातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसाार राज्यातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील ज्या घटकाला अजूनही वीज मिळालेली नाही किंवा विजेसाठी अर्ज करूनही केवळ जोडणीसाठी येणाऱ्या खर्चामुळे जोडणी देता आलेली नाही, अशा कुटुंबियांच्या घरात आता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेंतर्गत वीज पोहोचणार आहे.
अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या या योजनेंतर्गत प्रवगार्तील अर्जदाराला अनेक सवलती देण्यात आलेल्या आहेत. अर्जदाराला वीजजोडणीसाठी अर्ज करावा लागणार असून ५०० रुपयांची अनामत रक्कम भरल्यानंतर पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील पंधरा दिवसांत त्यास वीजजोडणी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ५०० रुपयांची अनामत रक्कम पाच समान हफ्त्यात भरण्याची देखील सोय करून देण्यात आलेली आहे.
अनेकदा काही घरे गावाबाहेर, डोंगर पायथ्याशी असतात. त्यांच्यापर्यंत वीज पोहोचवायची झाल्यास विद्युत खांबासह डीपी, तारांची जुळवाजुळव असे मोठे कामकाज करावे लागते. त्यासाठी संबंधिताला खर्च करावा लागतो; परंतु या योजनेत हा सर्व खर्च महावितरणच करणार आहे. स्वनिधी किंवा नियोजन विकास निधीतून अशा प्रकारचा खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
--इन्फो--
असंघटित उद्योगालाही लाभ
अनुसूचित जाती, जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज समस्यांचे निराकरण करण्यासाठी देखील महावितरणकडून कृती दलाची स्थापना केली जाणार आहे. अधीक्षक अभियंता यांच्या नियंत्रणाखाली या दलाचे कामकाज चालणार आहे. या कृती दलात अनुसूचित जाती, जमातीच्या
या अशा कृती दलात अनुसूचित जाती, जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उद्योजकांचा समावेश केला जाणार आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेब पोर्टलदेखील तयार केले जाणार आहे.