नाशिक : पुरातन काळापासून ते स्मार्ट नाशिकपर्यंतच्या प्रवासात नाशिक समृद्ध होत आले आहे. जिल्ह्याच्या अंतरंगाची माहिती समाविष्ट असलेला जिल्हाकोष लवकरच तयार करण्यात येणार असून, यासाठी आयोजित पहिल्याच बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाकोष निर्मितीचा आढावा घेतला. पौराणिक, ऐतिहासिक अशी ओळख असलेल्या नाशिकच्या विकासाच्या प्रवासाचे टप्पे यामध्ये देण्यात येणार असून, दोन खंडांत जिल्ह्याचा इतिहास शब्दबद्ध केला जाणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या गॅझिटिअर समितीच्या बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अनेक सूचना केल्या. तसेच समितीच्या कामकाजाचीही माहिती घेतली. यावेळी दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, नाशिक इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य चेतन राजापूरकर, दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ, माळोदे, आदींसह प्रशासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते. दर्शनिका विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाकोष अर्थात गॅझेट तयार केले जाते. जिल्हाकोष तयार करताना त्यात नाशिक जिल्ह्याविषयी सर्वंकश अधिकृत अशी माहिती प्रसिद्ध केली जाते. यात समाविष्ट होणारी माहिती आणि कामकाजासंदर्भातील चर्चा यावेळी करण्यात आली. या जिल्हाकोषमध्ये काय असले पाहिजे याविषयी सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या जिल्हाकोषमध्ये जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, रुढी परंपरा, चालीरीती, अर्थव्यवस्था, महसूल, प्रशासन, वनसंपदा, पर्यटनस्थळे, नद्या, संस्कृती, कृषी, उद्योग अशा अनेकविध विषयांची माहिती समाविष्ट केली जाणार असल्याने यासाठी लागणारे सहकार्य प्रत्येक विभागाने करावे, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिल्या.ब्रिटिशांना जिल्ह्याची ओळख व्हावी यासाठी त्यांनीच हा उपक्रम सुरू केला होता. नाशिक जिल्ह्यासाठीचे पहिले गॅझेट १८८३ मध्ये तयार करण्यात आले होते. त्यानंतर १९७५ मध्ये काही दुरुस्त्या करण्यात आल्याचे बेलसेकर यांनी सांगितले.असे असेल गॅझेटदोन खंडात जिल्ह्याचे गॅझेट तयार केले जाणार आहे. प्रत्येक खंड हा साधारणपणे १६०० पृष्ठांचा असेल. यामध्ये जिल्ह्याचा भूगोल, इतिहास (प्राचीन काळ, मध्ययुगीत, मराठा आणि आधुनिक काळाचे १८५७ ते १९२० आणि १९२० ते १९४७ असे दोन भाग करण्यात आलेले आहेत. कृषी, जलसिंचन, उद्योगधंदे, बॅँक व्यवसाय, व्यापार आणि वाणिज्य, वाहतूक व दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती, प्रेक्षणीय स्थळे व ग्रामनिर्देशिका अशा एकूण १२ प्रकरणांतर्गत येणाºया विविध बदलांच्या माहितीचा समावेश असणार आहे.