नाशिक : ‘गिनीपिग’ या कादंबरीतील वास्तव अत्यंत दाहक असून, ग्लोबलायझेशननंतर बदललेला गावगाडा, समाजव्यवस्था आणि आर्थिक स्तर यातील सूक्ष्म निरीक्षण आणि मानवी समस्यांचे बारकाईने टिपण या कादंबरीमध्ये केले असल्याचे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आसाराम लोमटे यांनी केले. नाशिकचे लेखक राकेश वानखेडे यांच्या ‘गिनीपिग’ कादंबरीचे ऑनलाइन प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते.
प्रगतिशील लेखक संघ आणि ब्लॅक इंक मीडिया या दोहोंच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात प्रमुख पाहुणे साहित्य अकादमी विजेते आसाराम लोमटे आणि डॉ. महेंद्र कदम यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना लोमटे यांनी मध्यम वर्ग आणि मध्यम जाती यांच्या दुभंगलेपणाबाबत मार्मिक भाष्य या कादंबरीत केले असल्याचे लोमटे यांनी नमूद केले, तर डॉ. कदम यांनी दलित, ग्रामीण, महानगरी, स्त्रीवादी, अशा सर्व कप्पेबंद मराठी साहित्याला मुक्त करणारी, तसेच मराठी कादंबरी तंत्र, भाषा, मोडतोड करत आपली स्वतंत्र वाट निर्माण करणारी ही कादंबरी असल्याचे सांगितले. जी वेगळे राजकीय तत्त्वज्ञान अधोरेखित करते. या कादंबरीने मराठी साहित्य विश्वात अनेक नव्या शक्यता निर्माण केल्या आहेत. त्या शक्यतांचा शोध पुढील काळात मराठी साहित्य विश्वाने घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कल्याणकारी राज्यापासून शासन म्हणून आपण प्रतारणा केल्याचे दुष्परिणाम समाजात जे दिसतात, त्याची चर्चा मोठ्या मनस्वीपणे या कादंबरीमध्ये आलेली असल्याचेही कदम यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कादंबरीचे लेखक राकेश वानखेडे यांनी ‘गिनिपिग’ कादंबरीची झालेली वाटचाल त्याचबरोबर या कादंबरीचे आशय सूत्रे, बीज संकल्पना याबाबत थोडक्यात माहिती दिली. यावेळी हस्ताक्षर प्रकाशनचे डॉ. विनायक येवलेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन गणेश पोकळे यांनी केले.