ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हैराण
नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी धास्तावला आहे. दुपारच्या सत्रात कडक ऊन पडत आहे तर संध्याकाळी ढगाळ व पावसाचे वातावरण तयार होत असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. गत आठवड्यात अवकाळी पावसाने येथे हजेरी लावली.
------------------
नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा
नांदूरशिंगोटे : पहिला डोस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा लागली आहे. एकीकडे प्रशासनाकडून नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, दुसरीकडे लसीचा वेळेवर पुरवठा होत नसल्याने आरोग्य विभागापुढे अडचणी निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस घेऊन तब्बल चाळीस दिवस झाले आहेत.
--------------------
लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन
नांदूरशिंगोटे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. नांदूरशिंगोटे गाव मध्यवर्ती ठिकाणी तसेच महामार्गावर असल्याने अनेक गावांमधील लोकांचा येथे संपर्क येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
----------------
शेतकऱ्यांची मशागतीची कामे सुरू
नांदूरशिंगोटे : खरीप हंगाम अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. खतांच्या वाढत्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी लागणारी रासायनिक खते, बी-बियाणे यांची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
------------
हॉटेल व्यवसाय अडचणीत
नांदूरशिंगोटे : गेल्यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत बंद असलेल्या हॉटेल व्यवसायाचे पुन्हा सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडले आहे. होम डिलिव्हरी सुरू असली तरी कोरोनामुळे ग्राहक बाहेरून पदार्थ मागविण्यास धजावत नसल्याने त्यालाही अल्प प्रतिसाद आहे. त्यामुळे अनेक हॉटेल कायमची बंद होण्याची शक्यता आहे.