नाशिक : मिशन महापालिकेसाठी दाखल झालेल्या राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक महापालिका आणि पेालीस यंत्रणेने हटवून अनोखे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी त्यास विरोध करून रास्ता राेको सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, त्यानंतरही फलक हटविण्यात आल्याने राजकारण तापले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक फलक हटविल्याचा आरोप केला, तर मनसेचे नेते संदीप शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांच्या आदेशानेच पोलीस कारवाई करीत असल्याचा आरोप केला.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने संघटनात्मक बांधणीसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे मंगळवारीच नाशिकमध्ये अन्य नेत्यांसह दाखल झाले. त्यानंतर बुधवारी (दि. २२) राज ठाकरे यांचे दुपारी आगमन झाले. ढोल-ताशे लावून हाॅटेल एसएसके येथे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले. काही वेळ थांबून राज ठाकरे खासगी कामासाठी गेले असता महापालिकेचे पथक तेथे धडकले आणि फलक हटविण्याची तयारी करू लागले. जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर तसेच अन्य कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलिसांना विरोध केला. केवळ मनसेचे फलक हटविले जात आहेत. गेले दहा दिवस गणेशोत्सवाचे आणि अन्य पक्षांचे देखील फलक लावले असताना त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आणि मनसेलाच कायदे, नियम दाखवतात का, असा प्रश्न करून कार्यकर्त्यांनी अडवले. तसेच घोषणाबाजी करून रस्त्यावरच ठिय्या दिला. मात्र, त्यानंतरही महापालिकेने फलक हटविले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, राज ठाकरे यांनी बुधवारी (दि. २२) नाशकात दाखल झाल्यानंतर नाशिकमधील निवडक नेते तसेच मुंबईतील पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. आज, गुरुवारी सकाळी मनसेच्या नूतन शाख्याध्यक्षांची निवड करून राज ठाकरे यांच्य हस्ते नियुक्तिपत्र दिले जाणार आहे. त्यावेळी ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
कोट....
फलक हटविले, हृदयातून कसे हटविणार
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक हटविण्यात आले आहेत. फलक हटले तरी नाशिककरांच्या हृदयात मनसे आणि राज ठाकरे कायम असून, त्यांना कसे हटविणार?
- संदीप देशपांडे, नेता, मनसे