नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात अघोषित सुरू असलेल्या वीज भारनियमनामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, जलकुंभ वेळेत न भरल्याने अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्याबाबत महापालिकेने महावितरण कंपनीला पत्र लिहून अखंडित वीजपुरवठ्याची जाणीव करून दिली आहे, तर आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह महापौरांनीही महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला आहे. दोन दिवसांत शहरात परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची ग्वाही महावितरणच्या अधिकाºयांनी दिली आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून दोन ते सहा तासांपर्यंत अघोषित वीज भारनियमन होत आहे. ऐन दिवाळी उत्सवाच्या तोंडावर भारनियमनाचा खेळ सुरू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. वीज भारनियमनामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे महापालिकेने थेट महावितरणला पत्र देत अखंडित वीजपुरवठ्याची जाणीव करून दिली आहे. महावितरणकडे एक्स्प्रेस फीडरची व्यवस्था असताना भारनियमन केले जात असल्याने जलकुंभ भरण्यात अडथळे निर्माण होत आहे. पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांवर अखंडित वीजपुरवठा अनिवार्य आहे. मात्र, विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे महापालिकेवरच नागरिकांचा रोष येत असून, महावितरणने तातडीने भारनियमन थांबवत अखंडित वीजपुरवठा करावा, असे मनपाने कळविले आहे. दरम्यान, शहरात अघोषित भारनियमनाबाबत वाढत्या तक्रारीवरून भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी महावितरणच्या अधिकाºयांची तातडीची बैठक बोलावत त्यांना जाब विचारला. यावेळी महापौर रंजना भानसी देखील उपस्थित होत्या. शहराला जोडण्यात आलेली बरीचशी खेडी ही महावितरणने ग्रामीण भागाला जोडली असल्याने या खेड्यांना भारनियमनाचा चटका सोसावा लागतो आहे. सदर खेडी ही ग्रामीण भागातून काढून ती शहराला जोडण्याची सूचना सानप यांनी केली. त्याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे यांनी दोन दिवसांत त्याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच एक्स्प्रेस फीडरवरून अखंडित वीजपुरवठा करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
वीज भारनियमनामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 12:34 AM