नाशिक : मतदार भाजपाला अनुकूल वाटावे, असा मानल्या जाणाऱ्या पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक १२ मधील गेल्या वीस वर्षांत कॉँग्रेस, मनसेने संमिश्र यश मिळवले. आत्ता उच्चभ्रु वसाहतीचा हा प्रभाग भाजपाला पुन्हा अनुकूल वाटत असताना बंडखोरीने डोके वर काढले असून, त्यामुळेच अडचणीचे ठरले आहे. अर्थात, महात्मानगर ते मुंबई नाका दरम्यानच्या या प्रभागात कॉँग्रेसचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.महात्मानगर, कॉलेजरोड, शरणपूररोड, तिडके कॉलनीपासून मुंबई नाक्यापर्यंतच्या या प्रभागात उमेदवारांनी सामाजिक, ज्ञाती संख्येचे गणिते काहीही बांधले असले तरी त्यापेक्षा वेगळे म्हणजे सर्व धर्मीय म्हणजे अगदी सिंधी - ख्रिश्नच बांधवांचाही त्यात समावेश आहे. प्रभाग उच्चभ्रु अधिक असला तरी त्यात सहा झोपडपट्ट्या असून, त्यामुळे अत्यंत समतोल? असा प्रभाग आहे. गेल्या चार निवडणुकांपासून महात्मानगर भागाचे प्रतिनिधित्व कॉँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे करीत होते, तर शरणपूर भागाचे नेतृत्व गेल्या पाच पंचवार्षिक कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक उत्तमराव कांबळे करीत आहेत. त्यापुढील भागात कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील आणि मनसेच्या सुजाता डेरे यांनी नेतृत्व केले आहे. तथापि, एकंदरच सध्याच्या भौगोलिक रचनेचा विचार केला, तर कॉँग्रेसचे प्राबल्य अधिक दिसते. परंतु राज्यातील सत्ता बदलाने भाजपाचा हुरूप वाढला आहे. त्याचा एक परिणाम म्हणून कॉँग्रेसचे चारवेळा निवडून आलेले नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्यासमवेत असलेल्या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवक छाया ठाकरे यांनी कॉँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी अल्पविराम घेतला आहे. उत्तमराव कांबळे यांनी आता समीर कांबळे यांच्या त्यांच्या मुलाला पुढे केले असून, आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यांच्यासमवेत असलेल्या आणि उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी शिवसेनेत दाखल झालेल्या योगीता अहेर यांनीही पक्ष बदल करून उमेदवारी केली आहे. भाजपाचे चार आणि आघाडीतील चारही जागा काँग्रेसला दिल्याने या पक्षाचे चार तसेच शिवसेनेचे चार आणि भाजपाचे दोन प्रमुख बंडखोर अशी प्रभागाची स्थिती असून त्यामुळे आज मितीला सर्वच पक्षांच्या दृष्टीने फेअर वॉर्ड आहे. अर्थात, आजवर शिवसेनेला या प्रभागात जम बसवता आला नसून नवख्या उमेदवारांवर त्यांची मदार आहे. प्रभागातील ब या नागरिकांचा मागासवर्गीय प्रभागात भाजपाचे उमेदवार हेमंत धात्रक यांना पक्षाचे बंडखोर सुरेश पाटील यांनी आव्हान दिले आहे. सुरेश पाटील मूळ कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे त्यांनी स्थायी समितीचे सभापतिपदही भूषविले आहे. सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी ते भाजपात झाले आणि गेल्यावेळी याच प्रभागात पराभूत झाले होते. विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी दावेदारी करणाऱ्या पाटील यांना महापालिकेची उमेदवारी न देता पक्षात फारसे सक्रिय नसलेल्या हेमंत धात्रकांना उमेदवारी न दिल्याने पाटील रिंगणात उतरले आहेत. याच प्रभागात कॉँग्रेसचे समीर कांबळे हे दावेदार आहेत. याशिवाय तुषार अहेर (शिवसेना), अमर काठे (मनसे) हेदेखील रिंगणात आहेत. सर्वसाधारण जागेसाठी भाजपाचे शिवाजी गांगुर्डे, कॉँग्रेसचे शैलेश कुटे यांच्यात प्रमुख लढत असली तरी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश दीक्षित यांनी बंडखोरी केली आहे. कुटे हे माजी नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष असून, त्यांची गांगुर्डे यांना कडवी झुंज असणार आहे. (प्रतिनिधी)
भाजपाची बंडखोरी, विरोधकांनाही तारी
By admin | Published: February 12, 2017 12:34 AM