मनोज मालपाणी, नाशिक-अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त दोषी असतो ही शिवसेनाप्रमुखांची आम्हाला शिकवण आहे. पक्षप्रमुखांनी शब्द दिलेला असताना देखील उमेदवारी ही ऐनवेळी बदलल्यामुळे प्रथम त्यांच्याशी याबाबत बोलू. मात्र लोकसभा निवडणूक लढविणारच असल्याचे शिवसेनेचे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि बंडखोरीचा पवित्रा घेतला.
महाविकास आघाडी मधून शिवसेनेच्या वतीने विजय करंजकर हे प्रमुख दावेदार व त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जात होती. मात्र, आज सकाळी शिवसेनेकडून राज्यातील पहिल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नाशिक मधून लोकसभेचे उमेदवार म्हणून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामुळे गेल्या वर्षभरापासून निवडणुकीच्या कामाला लागलेले करंजकर व त्यांचे समर्थक यांना धक्का बसला.
याबाबत पत्रकारांशी बोलताना करंजकर म्हणाले की, वर्षभरापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक लोकसभा मधून निवडणूक उमेदवारी बाबत शब्द दिला होता. तेव्हापासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. दोन महिन्यापूर्वी शिवसेना अधिवेशनाप्रसंगी देखील पक्षप्रमुख व इतर नेत्यांना निवडणुकीबाबत सुरू असलेले कामकाज याबाबत माहिती दिली होती. मात्र ज्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा नव्हती एनवेळी पक्षाकडून त्यांचे नाव जाहीर करण्यात आल्याने धक्का बसल्याचे करंजकर यांनी सांगितले.
येत्या दोन दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती सांगणार आहे. मात्र लोकसभा निवडणूक लढविणारच असल्याचे करंजकर यांनी स्पष्ट केले. निवडणूक कोणाकडून लढवणार हे वेळेवर स्पष्ट करू असे देखील करंजकर यांनी सांगितले. अन्याय सहन करणार नाही तर अन्यायाबाबत विचारणा नक्कीच करू असे देखील करंजकर यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार योगेश घोलप यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी नितीन पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक उपस्थित होते.